लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई- नवी मुंबई शहरात अनंत चतुर्दशीला होणाऱ्या विसर्जन सोहळ्यासाठी पालिकेने जय्यत तयारी केली असून हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी पालिकेच्या मदतीला विविध सामाजिक संस्थांचे हजारो हात मदतीला उपस्थित राहणार असून श्रीगणेशोत्सवातील दीड दिवस, गौरीसह पाचव्या व सातव्या दिवसाचे श्रीमूर्ती विसर्जन अत्यंत सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले असून अनंत चतुर्धशीला होणाऱ्या विसर्जन सोहळ्याची पालिकेने जय्यत तयारी केली असून पालिका आयुक् राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील २२ नैसर्गिक व १४१ कृत्रिम विसर्जन स्थळांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुयोग्य व्यवस्था करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवातील आकाराने मोठ्या मूर्तींचे विसर्जन होत असल्याने महापालिका क्षेत्रातील सर्व १६३ विसर्जन स्थळांवर अधिक चोख व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली.
अनंत चतुर्दशीदिनी सर्व २२ विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून ७६२ स्वयंसेवक, ३९० लाईफगार्ड्सची व्यवस्था अधिक कृतिशीलपणे असणार आहे. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवान कार्यरत असणार आहेत. पोलीस यंत्रणेचेही विसर्जन स्थळावरील कायदा व सुव्यवस्थेकडे बारकाईने लक्ष असणार आहे. सर्व २२ विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सी.सी.टी.व्ही.ची नजर असणार आहे..श्रीमूर्ती विसर्जनाकरिता सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळी ४० मध्यम व ८ मोठ्या तराफ्यांची तसेच मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी येतात अशा विसर्जन स्थळांवर १९ फोर्कलिफ्ट / क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन स्थळांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी बांबुचे बॅरेकेटींग करण्यात आले असून विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि भक्तजनांना व्यवस्थितरित्या श्रीमूर्तींची निरोपाची आरती व पूजा करता यावी यादृष्टीने रांगेत टेबलची मांडणी करण्यात आली आहे.
आणखी वाचा-१५० सीसीटीव्ही निरीक्षणातून अपहरणाचा छडा; ४ वर्षीय चिमुरडीची सुटका, आरोपीला अटक
विसर्जन स्थळांपैकी ‘तलाव व्हिजन’ अंतर्गत सुशोभित करण्यात आलेल्या १४ मुख्य तलावांमध्ये गॅबियन वॉल निर्धारित क्षेत्रातच भाविकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रीमूर्तींचे विसर्जन करावे. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून विसर्जनस्थळांवर सूचना व स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठामुळे भाविकांची गर्दी मोठी असूनही त्यांना आवश्यक सूचना देणे व गर्दीचे नियोजन करता येणार आहे.विसर्जनस्थळांवर नागरिकांमार्फत श्रीमुर्तींसोबत आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे “ओले निर्माल्य” त्यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या निर्माल्य कलशातच टाकावे तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान, प्लास्टिक अशा “सुके निर्माल्य” स्वतंत्र कलशात टाकावे, कोणत्याही परिस्थितीत या वस्तू पाण्यात टाकू नयेत अशा महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली असून हे निर्माल्य महानगरपालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेले जात आहे व त्याचे पावित्र्य जपत त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे श्रीमुर्तींसोबत आणली जाणारी फळे व खाद्य वस्तू गरजू मुलांना व नागरिकांना वितरण करण्यात येत आहेत.
वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीगणेशविसर्जन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन सुयोग्य व्यवस्था करण्यात आली असून त्याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या मोठ्या मंचावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
आणखी वाचा-हवा प्रदूषणात उरणचा देशात पहिला नंबर
दरवर्षीप्रमाणेच नागरिकांच्या मिळणा-या उत्तम सहयोगामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सवातील आत्तापर्यंतचे श्रीमूर्ती विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले असून अनंतचतुर्दशी दिनी मोठ्या प्रमाणात होणा-या विसर्जन सोहळ्याकरिता महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांचेमार्फत सर्वोतोपरी दक्षता घेण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी हा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे. -राजेश नार्वेकर, आयुक्त नवी मुंबई महापालिका
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो हात पालिकेच्या मदतीला….
डॉ. नानासाहेब धर्प्रमाधिकारी प्रतिष्ठाणचे हजारो श्री सदस्य गणेशोत्सवाच्या काळात पालिकेच्या मदतीसाठी कार्यरत असून महाराष्ट्रभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्य संकलनातून कंपोस्ट खत निर्मिती केली जात असून त्यासाठी निर्माल्य संकलनाचे व हजारो गणेशभक्तांना सहकार्य करण्याचे काम श्रीसदस्य करणार आहेत. यामध्ये विविध रिक्षा व टॅक्सी संघटनाही मदतीस असणार आहेत. -प्रवीण कडू, श्रीसदस्य, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान
शांततेत विसर्जन सोहळा पार पडण्यासाठी १ हजार ते १२०० पोलीस फाट सज्ज
नवी मुंबई शहरात शांततेत विसर्जन सोहळा पार पडण्यासाठी पोलीस व्यवस्था सज्ज असून एसआरपीएफसह जवळजवळ १००० ते १२०० पोलीस सज्ज आहेत. तसेच वाहतूक पोलीस विभागही मदतीला असून शांततेत सोहळा संपन्न होण्यासाठी व्यवस्था सज्ज आहे. -विविके पानसरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १