पनवेल: तालुक्यातील भाताण व कसळखंड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाहतूक कोंडीमुळे येथील अमेठी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. या शैक्षणिक संकुलाला सात वर्षे झाली असून येथे देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अरुंद रस्ते, वाहनचालकांची बेशिस्त आणि वाहतूक पोलिसांनी गैरहजेरीमुळे विद्यार्थी, पालकांना दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या शैक्षणिक संकुलात येणारे अनेक विद्यार्थी पनवेल व नजीकच्या परिसरात राहतात. तसेच मुंबई, नवी मुंबईसह पनवेल तालुक्यातील विविध वसाहतींमधून असंख्य विद्यार्थी येथे येतात. यंदाच्या शैक्षणिक वर्षांचे वर्ग सोमवारपासून सुरू झाल्याने, तसेच सकाळी नऊ वाजण्याची वेळ गाठायची असल्याने अनेक विद्यार्थी व पालकांची वाहने सकाळी आठ वाजल्यापासून खोपोली- पनवेल महामार्गावरील आजिवली गावाच्या मार्गापासून महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जात होते. यामध्ये महाविद्यालयात यापूर्वी शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांची खासगी वाहने व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सार्वजनिक वाहनांचा समावेश होता.

सूमारे तीनशे वाहने सकाळी साडेआठपर्यंतच्या सत्रात पोहचली होती, शिवाय तीनशेहून अधिक वाहनांची कोंडी या मार्गावर होती. शिवाजीनगर व आष्टेगावालगतचा अरुंद पुलावरून एकेरी वाहतुकीसह गावातील अरुंद रस्त्याचा सामना वाहनचालकांना करावा लागला. महाविद्यालय प्रशासनाने तीन कर्मचारी वाहतूक नियमनासाठी उभे केले होते, मात्र हे मनुष्यबळ तोकडे पडले होते. अनेक विद्यार्थी कोंडीत अडकल्याने पालकांसोबत पहिल्या दिवसाचा वर्ग वेळेत गाठण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागली. पहिलाच दिवस असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी लागली तयारी केली होती, मात्र वाहतूक कोंडीतून पायपीट करावी लागल्याने अनेकांना घामाघूम व्हावे लागले. या कोंडीमुळे विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला.  

महाविद्यालयाच्या वतीने मुंबई महानगर रस्ते विकास प्राधिकरणाकडे, यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरून सेवा रस्त्याची मागणी केली आहे. गेल्या चार वर्षांत या प्रस्तावावर कार्यवाही झाली नसली तरी आमचा पाठपुरावा सुरूच आहे. पुढच्या वर्षांपर्यंत तरी ही मार्गिका होईल अशी अपेक्षा आहे. सोमवारी फक्त महाविद्यालय सुरू होणार होते. त्यामुळे पालक एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाहने घेऊन येतील अशी कल्पना नसल्याने वाहतूक पोलिसांना याबाबत कळविण्यात आले नव्हते.  – एच. एस. व्यास, रजिस्ट्रार, अमेठी विद्यापीठ, पनवेल

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousands of students studying in amethi university suffer due to traffic jam zws