नवी मुंबई : अंमली पदार्थाचे सेवन करून त्याच्या रिल्स बनवून इंस्टाग्राम या समाज माध्यमात टाकणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या चौघात एक जण अल्पवयीन आहे. त्यांच्या कडून ५ लाख ४० हजार रुपयांचा महागडा हेरॉईन हा घटक अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
चार मित्रांनी मिळून एक रिल्स बनवून इन्स्ट्राग्राम या समाज माध्यमात प्रसारित केली. त्यात त्यांनी अंमली पदार्थ सेवन करताना चित्रीकरण दाखवले होते. हि बाब समोर येताच पोलिसही सतर्क झाले होते. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या चौकडीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुशंघाने अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, सुरज गोरे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बनकर, पदु दारे, उत्तम लॉखडे, पोलीस नाईक अंकुश म्हात्रे, संजय फुलकर, महेद्र अहिरे, हेमांगी पाटील, पोलीस शिपाई परमेश्वर भाबड यांचे पथक नेमण्यात आले. या पथकाने सदर चारही व्यक्तींचा शोध सुरु केला. दरम्यान गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हि चौकडी अंमली पदार्थ विक्री साठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर बेलापूर येथील पंचशिल नगर येथे सापळा लावण्यात आला.
यात संतोष दिनेश कांबळे (वय २२ वर्षे ) सलमान सलिम दौला (वय २९ वर्षे), सनी दिनेश कांबळे (वय २४ वर्षे) आणि एक अल्पवयीन युवक अडकले. या सर्वांची अंग झडती घेतली असता त्यांच्या कडून ५ लक्ष ४० हजार रुपयांचे १८ ग्रॅम वजनाचे हेरॉईन हा अंमली पदार्थ आढळून आला. अंमली पदार्थ विक्री तसेच इंस्टाग्रामवरती अंमली पदार्थाबाबत व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी त्यांच्यावर शुक्रवारी अपरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक असणाऱ्या तीन आरोपींना ११ तारखे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.