उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी; २० फेब्रुवारीला जत्रोत्सव
पनवेलमधील प्रसिद्ध उरूस यंदा आठ दिवसांऐवजी तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे. पीर करमअली शहाबाबा दग्र्याच्या वतीने दरवर्षी जत्रोत्सव साजरा करण्यात येतो. उत्सव साजरा करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पनवेल नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. दोन आठवडय़ांपासून नगरपालिका, पोलीस विभाग आणि उरूस आयोजक यांच्यात बोलणी सुरू होती. बुधवारी झालेल्या विशेष सभेत अखेर हा निर्णय घेण्यात आला.
२० फेब्रुवारीला जत्रोत्सव साजरा होत आहे. त्यानंतर दोन दिवसांत आयोजकांनी उत्सवस्थळी लागलेले स्टॉल हटवायचे आहेत. नगरपालिकेचे मैदान आणि तलावाजवळील रस्त्यावर हा उरूस सुरुवातीला साजरा करण्यात येत होता. परंपरेनुसार दग्र्यावर चादर चढविण्याचा पहिला मान येथील बापट कुटुंबीयांना दिला जातो; मात्र काही वर्षांपासून जत्रोत्सवात स्टॉलच्या वाढत्या संख्येमुळे शहरवासीयांना त्रास होत होता. उत्सवातील स्टॉल्स पुढे दहा ते १२ लावले जात होते.
त्यामुळे वाहतूक कोंडी आणि वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक हैराण झाले होते. शिवसेनेने हा मुद्दा लावून धरल्यानंतर प्रशासनाने चर्चेचा प्रस्ताव ठेवला. सोमण यांनी नगरपालिकेत हा मुद्दा मांडल्यानंतर काही नगरसेवकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती; परंतु चर्चेनंतर अखेर तीन दिवसांचा उरूस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यात पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे हे आदेश अंमलबजावणीच्या निर्णयावर ठाम राहिल्याने तसेच पनवेल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगशे चितळे व नगराध्यक्षा चारुशिला घरत यांनी त्याला पाठिंबा दिल्याने जत्रोत्सव रस्ता अडवून होणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा