पनवेल : आदिवासी बांधवांच्या ७४ कुटुंबीयांच्या तीन पिढ्या रोडपाली येथील फुडलॅण्ड कंपनीच्या मागील जागेवर वास्तव्य करुनही अजूनही हक्काच्या घरापासून वंचित राहिल्या आहेत. सध्या आदिवासी बांधव राहत असलेल्या जागेवर ट्रक टर्मिनलचे आरक्षण पनवेल प्रारुप विकास आराखड्यात आखल्याने आदिवासी बांधवांनी याबाबत हरकत घेतली होती. याच हरकतींवर बुधवारी पनवेल शहरातील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात सुनावणी झाली. या सुनावणीसाठी आदिवासी बांधव आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रारुप विकास आराखड्यावर दोन दिवसांपासून पालिकेने सुनावणी सुरू केली असून याच सुनावणी दरम्यान आदिवासी बांधवांच्या प्रतिनिधींनी हक्काचे घर मिळावे अशी मागणी विकास आराखड्यावर स्थापन केलेल्या पाच सदस्यांच्या समितीसमोर मांडली. आतापर्यंत ७८१ हून अधिक हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली असून पुढील दीड महिन्यात ५,५८४ हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे.

हेही वाचा…वायू पुरवठ्याविना वीज प्रकल्प ‘गॅसवर’ उरण वीज प्रकल्पातील उत्पादन निम्म्यावर

सिडको महामंडळाने रोडपाली व खिडुकपाडा येथील आदिवासी बांधवांना त्यांचा हक्काचा निवारा न देता थेट पनवेल महापालिकेला हस्तांतरण प्रक्रिया केल्यामुळे रोडपाली येथील फुडलॅण्ड कंपनीलगतच्या आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळण्याचा पेच वाढला आहे. १९७० च्या पूर्वीपासून सुरूवातीला २४ कुटूंब फुडलॅण्ड कंपनीच्या मागील बाजूस कासाडी नदी किनारपट्टीजवळ राहत होते. तशी नोंद सातबारावर आहे. चार चाळींमध्ये २४ खोल्यांमध्ये आदिवासी बांधव राहत असल्याची नोंद असूनही सिडकोने पनवेल पालिकेला जमीन हस्तांतरणापूर्वी या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन केले नाही.

हेही वाचा…नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ

मागील तीन पिढ्यांपासून येथे राहत असलेले पुरावे घेऊन याच वाडीतील एकनाथ वाघे, गुरुनाथ वाघे आणि युवासंस्थेचे सुजीत निकाळजे यांनी आदिवासी बांधवांच्या वतीने समितीसमोर बाजू मांडली. सर्व नोंदी पाहिल्यावर या नोंदीची खात्री करुन समिती पुढील अभिप्राय ठरविणार आहे. पनवेल प्रारुप विकास आराखडा सुनावणीसाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये पनवेल पालिका आय़ुक्त मंगेश चितळे, नगररचना विभागाचे माजी संचालक सुधाकर नांगनुरे, सेवानिवृत्त नगर रचनाकार किशोर अग्रहारकर, शेखर चव्हाण, सेवानिवृत्त प्रधान वैज्ञानिक अधिकारी डॉ. अमर सुपाते हे सदस्य आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three generations of 74 panvel tribal families remain homeless despite living near foodland company sud 02