नवी मुंबई: घणसोली येथील एका चौकडीने कोल्ड्रिंकचे पैसे मागणाऱ्या किराणा दुकानमालकास मारहाण करीत चाकूचे वार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मारहाण आणि हत्येचा प्रयत्न या कलमांन्वये गुन्हा नोंद झाल्यावर पोलिसांनी चार आरोपींपैकी तिघांना अटक केली आहे, तर एकावर उपचार सुरू आहेत.
निलेश भालेराव, नितीन भालेराव, विश्वदीप राजने आणि राजू साठे अशी यांतील आरोपींची नावे आहेत. १७ तारखेला रात्री साडेआठच्या सुमारास या चौघांनी मिळून सेक्टर ५ येथील ओंकार नावाच्या किराणा दुकानातून चार कोल्ड्रिंकच्या बाटल्या घेतल्या. त्याचे पैसे दुकानदार ओमप्रकाश चौधरी यांनी मागितले. मात्र पैसे न दिल्याने ओमप्रकाश यांनी त्या बाटल्या चौघांच्या हातातून घेत दुकानात ठेवून दिल्या. याचा राग मनात ठेवत या चौघांनी चौधरी यांना बेदम मारहाण केली. यातील निलेश याने जवळील चाकूने चौधरी यांच्यावर वार केले. यामध्ये चौधरी जखमी झाले. एवढ्यावर हे चौघे थांबले नाहीत तर त्यांनी दुकानातील सामानाची तोडफोड केली.
हेही वाचा…. उरण-पनवेल मार्गावरील खाडीपूल दुरुस्तीची प्रतीक्षाच? पावसाळ्यापूर्वी काम अशक्य
ही माहिती मिळताच चौधरी यांच्या भावाने पोलिसांना कळवले. दरम्यान चौघे पळून गेले. शेजारच्यांच्या मदतीने ओमप्रकाश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत दुसऱ्या दिवशी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात चौधरी यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून हल्ला करणाऱ्या या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी तात्काळ पथक पाठवून तीन आरोपींना बुधवारी अटक केली. तर या मारहाणीत जखमी झाल्याचा दावा करत असल्या साठे याच्यावर उपचार सुरू असून त्यालाही अटकेला सामोरे जावे लागणार आहे, अशी माहिती कोपरखैरणे पोलिसांनी दिली.