नवी मुंबईत दोन वर्षांपुर्वी करोनामुळे दहीहंडी उत्सवाची घागर उतानीच पाहायला मिळाली. परंतु करोनानंतर गेल्यावर्षापासून नवी मुंबईतही दहीहंडीचा उत्साह वाढला आहे. यंदा नवी मुंबई शहरात ५० सार्वजनिक दहीहंडी उत्सवाला परवानगी देण्यात आली असल्याची माहिती परिमंडळ १ चे उपायुक्त विवेक पानसरे यांनी लोकसत्ताला दिली. नवी मुंबईत वाशी, ऐरोली, घणसोली, सानपाडा कोपरखैरने, नेरूळ सीवूड्स बेलापूर या विभागासह शहराच्या विविध उपनगरात हा उत्सव आनंदाने साजरा केला जाणार आहे. यासाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे.
हेही वाचा >>> कसत असलेल्या जमिनीसाठी मंत्रालयावर आदिवासी बांधवांचा मोर्चा
नवी मुंबई शहरात दहीहंडी उत्सवाची परंपरा आहे. दहीहंडी उत्सवाच्या अगोदर चोरहंडी उत्सवही साजरा केला जातो. या चोरहंडी उत्सवाचे आयोजन जुईनगर विभागात करण्यात आले होते. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. ऐरोली विभागात शिवसनेच्या शिंदे गटाचे विजय चौगुले यांच्यावतीने सुनील चौगुले स्पोर्टस असोसिएशनच्या माध्यामातून अकरा लाखांचे विविध पारितोषिक देण्यात येणार असून ऐरोली मधील सर्वात मोठी दहीहंडी आहे. ऐरोली सेक्टर १५ येथी गणेश इच्छापुर्ती मंदिराजवळ दहीहंडी उभारण्यात आली आहे. या कार्यक्रमात वाद्यवृदांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात अलेला आहे. सानपाडा विभागात भाजपचे पांडुरंग आमले व साई भक्त सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने सानपाडा सेक्टर ८ येथील हुतात्मा बाबू गेणू मैदान येथे सोन्याच्या हंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या दहंडीमध्ये सहा ताळे सोने वापरुन हंडीला सोन्यांचा मुलामा देण्यात आला. जो गोविंदा पथक हंडी फोडणार त्यांना ही हंडी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांला विशेष उपस्थिती आमदार मंदा म्हात्रे लावणार असल्याची माहिती पांडुरंग आमले यांनी दिली. घणसोली येथे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची शिवसेनेचे ए.के. पाटील यांच्या माध्यामातून घणसोली सेक्टर १० येथील संत निरंकारी चौकामध्ये दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वाद्यावृंदाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे. याच बरोबर शहरात विविध छोट्या मोठ्या दहीहंडीचे आयोजनही करण्यात येणार आहे.
५० सार्वजनिक दहीहंडी उत्सवांना परवानगी
नवी मुंबई शहरात ५० सार्वजनिक दहीहंडी उत्सवांना परवानगी देण्यात आली असून शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी चोख पोलीस व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. विवेक पानसरे उपायुक्त परिमंडळ १