पूनम धनावडे
घाऊक बाजारात लाल मिरचीची आवक; काही गरम मसाले महागले
उन्हाच्या झळा आता बसण्यास सुरुवात झाली असून गृहिणींची मसाला तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. वाशीतील घाऊक मसाला बाजारात नवीन लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा आवक चांगली असल्याने यंदा मात्र घाऊक बाजारात दर १० रुपयांनी कमी आहेत, तर किरकोळ बाजारात स्थिर आहेत. गरम मसाल्यांमध्ये मात्र यंदा वेलची, खसखस याची दरवाढ झाली आहे.
महिला वर्षभराचा मसाला एकदाच करून ठेवतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच लाल मिरची, गरम मसाले पदार्थ खरेदीची लगबग सुरू होते. मार्चपासून एपीएमसी मसाला बाजारात कर्नाटक, बंगळूरू, आंध्र प्रदेशमधून मोठय़ा प्रमाणात लाल मिरची दाखल होण्यास सुरुवात होते. ८ ते १० गाडय़ांवरून २० गाडय़ांची आवक झाली आहे. तसेच लाल मिरचीमधील पांडी, लवंगी, बेडगी, काश्मिरी, शंकेश्वरी यांची आवक होते. लवंगी, काश्मिरी, बेडगी, शंकेश्वरी मिरचीला महिला अधिक पसंती देतात.
या वर्षी किरकोळ बाजारात लवंगी मिरची १२० ते १३०, बेडगी १४० ते १८०, पांडी मिरची १२० आणि काश्मिरी मिरची १७० ते १८० रुपये किलो आहे. मागील वर्षी हे दर ३० रुपयांनी जास्त होते. तसेच गरम मसाल्यामध्ये लवंग ८०० ते
१२०० रु, धने १२० ते २०० रु, दालचिनी २५० ते ५०० रु, काळीमिरी ४०० ते ७०० रु आणि हळकुंड १५० ते २०० रुपये प्रतिकिलो भाव असून ते स्थिर आहेत.
वेलची, खसखस महागली
मसाला बनविण्यासाठी लाल मिरचीबरोबर लागणाऱ्या काही गरम मसाल्यात दरवाढ झाल्याचे व्यापारी निखिल बोटे यांनी सांगितले. यामध्ये यंदा वेलची, खसखस याची दरवाढ झाली आहे. मसाला वेलची प्रतिकिलो ८०० रुपयांना आहे. ती आधी ६०० रुपये होती. हिरवी वेलची प्रतिकिलो २ हजार २०० रुपये भाव आहे, ती आधी १४०० रुपये होती तर खसखस आधी प्रतिकिलो ५५० रुपये होती, ती आता ९०० रुपये आहे.