पनवेलजवळील अपघातानंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची ग्वाही
अपघात रोखण्यासाठी वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणणे आवश्यक असून, परिवहनाबाबत राज्य सरकार नवा कायदा लवकरच तयार करणार आहे. त्यामुळे अतिवेगाला चाप बसून, अपघात टळतील, अशी अपेक्षा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी व्यक्त केली. द्रूतगती मार्गावर रविवारी झालेल्या भीषण अपघातातील जखमींची रावते यांनी कामोठेतील एमजीएम रूग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी अपघात रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची ग्वाही दिली.
स्पीड-गव्हर्नसशिवाय वाहन चालकांची वेगधुंदी उतरणार नाही. त्यामुळे राज्यात नव्या वाहनांच्या निर्मितीवेळीच त्यात स्पीड-गव्हर्नसचा समावेश असेल. मात्र, राज्यभरात रस्त्यावर धावणाऱ्या जुन्या नऊ लाख वाहनांना तीन महिन्यांत स्पीड गव्हर्नन्स लावण्याचा निर्णय घेण्यात येईल. दोन आठवडय़ांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.
वेग नियमांचा भंग करणाऱ्यांना मोठा दंड करण्याची तरतूद नव्या कायद्यात करण्यात येईल. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेमलेल्या समितीच्या दोन बैठका झाल्या असून, तिसरी बैठक गुरूवारी होणार असल्याचे रावते यांनी सांगितले. रविवारच्या अपघातामुळे किमान महामार्गाच्या दोन्ही बाजूला लोखंडी कठडे बसविण्यापेक्षा अपघातानंतर वाहने महामार्गाखाली घसरू नयेत आणि तेथेच रोखली जावी यासाठी तेथे संरक्षक कठडे बांधले जाण्याची आवश्यकता रावते यांनी व्यक्त केली.
अपघाताचे कारण अस्पष्ट
- रविवारच्या अपघातामध्ये पनवेल शहर पोलिसांच्या तपासात या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांच्या तपासामुळे हा अपघात द्रुतगती महामार्गावर उजव्या बाजूला उभ्या असलेल्या स्विफ्ट कारमुळे झाला की उजव्या बाजूने भरधाव वेगाने चालणाऱ्या बसमुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
- वेगावरील नियंत्रण आणि निखिल ट्रॅव्हल्सच्या बसचालकाने बेकायदा पाच ते सहा प्रवासी चालक केबिनमधून प्रवास केल्याच्या वृत्ताला रावते यांनी दुजोरा दिला.
- खोपोली टोलनाक्याला तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या रांगेतून बस चालविणारे ६५ वर्षीय इक्बाल शेख महामार्ग समाप्तीपूर्वी पहिल्या रांगेत का आले असावे याचाही शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांच्या तपासातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांना अद्याप शेखसोबतचा सहकारी चालक किंवा मदतनीस सापडलेला नाही. त्यामुळे सातारा ते बोरिवली ही बस विनासहकाऱ्याची शेख चालवत होता का, असा प्रश्नही पोलिसांना पडला आहे. सचिन गोडसे यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या बसच्या फीटनेसचे पेपर अद्याप पोलिसांकडे गोडसे यांनी जमा केलेले नाहीत.
- स्विफ्ट मोटारीचे मालक अमरजित सिंग यांनी टायर फुटल्यानंतर तो बदलण्यासाठी स्वत:ची मोटार महामार्गाच्या डाव्या बाजूच्या सव्र्हिस रस्त्यावर उभी केली असती तर हा अपघात टळला असता, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. अपघातापूर्वी या महामार्गावर पाऊस पडल्याने हा मार्ग ओला होता. त्यामुळे ६५ वर्षीय इक्बाल शेख या बसचालकाला पांढऱ्या रंगाची स्विफ्ट मोटार अचानक समोर दिसल्याने तो मोटारीला वाचविण्यासाठी उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला गेला असावा, असे मत एका प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.