यंदा टोमॅटोची लागवड कमी आहे. त्यामुळे उत्पादन कमी मागणी जास्त आहे. गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला होता. मात्र हळूहळू टोमॅटोची आवक वाढत असून दर उतरत आहेत. गुरुवारी घाऊक बाजारात आवक वाढल्याने प्रतिकिलो दरात १०-१५रुपयांनी घसरण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दरात मंदी होती,अगदी कवडीमोल दराने विक्री होत होती. काही शेतकऱ्यांनी तर १-२रुपये दराने विक्री झाल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून ही दिले होते. मिळत असलेल्या कवडीमोल दराने टोमॅटो लागवडीचा खर्च ही निघत नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे मागील दोन ते तीन महिन्यांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते.
हेही वाचा >>> उरण मध्ये पावसाचा पंधरा दिवस खंड पडल्याने उरणच्या नागरिकांची पाणी चिंता वाढली
जुलै महिन्यानंतर टोमॅटोच्या दरात सातत्याने विक्रमी वाढ होत होती. घाऊक बाजारात प्रतिकिलो १३०रुपये तर किरकोळीत १६०रुपयांवर पोचले होते. एरव्ही बाजारात टोमॅटोच्या ४०-५०गाड्या दाखल होत होत्या मात्र उत्पादन घटल्याने बाजारात अवघ्या १०-१५गाड्या दाखल होत होत्या . त्यामुळे टोमॅटोच्या दराने उसळी घेतली आहे. मात्र आता बाजारात राज्यातील आवक वाढण्यास सुरूवात झाली आहे. गुरुवारी नाशिक आणि सासवड येथून टोमॅटोची आवक वाढली असून २२-२५गाड्या दाखल झाल्या आहेत.त्यामुळे बाजारात ५०% आवक वाढल्याने घाऊक दरात १०-१५रुपयांनी घसरण झाली आहे. बुधवारी घाऊक बाजारात प्रतिकिलो ५५-६०रुपयांनी विक्री होणारे टोमॅटो गुरुवारी ४०-५०रुपयांवर आले आहेत. बाजारात राज्यातील टोमॅटो दाखल होत असल्याने दर उतरले आहेत.
किरकोळीत मात्र दुप्पट दराने विक्री
एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात गुरुवारी टोमॅटोचे दर ४०-५०रुपयांवर असताना ही किरकोळ बाजारात मात्र ८०-१००रुपयांनी विक्री होत आहे. किरकोळ बाजारवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरु असतो. परिणामी याची झळ मात्र सामान्य ग्राहकांना बसते. किरकोळ बाजारात नित्यानेच घाऊक भाजीपाला दराच्या दुप्पट ते तिप्पट दराने विक्री केली जाते. यामध्ये शेतकऱ्यांना ही योग्य मोबदला मिळत नसून सामान्य नागरिक ही भरडला जात आहे. किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरावर ही सरकारचा वचक असणे गरजेचे झाले आहे,असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.