नवी मुंबई : एपीएमसीत परराज्यांतून आणि राज्यातून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात सध्या ३३ गाड्या एवढीच आवक होत असून दरात प्रतिकिलो २० रुपयांनी दरवाढ झाली आहे. आधी ४०-५० रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटोचे दर आता ७०-८० रुपयांवर पोहोचले आहेत.

वाशीतील एपीएमसी बाजारातच टोमॅटो कमी प्रमाणात दाखल होत आहेत. घाऊक बाजारामध्येच ७०-८० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहे. मागील आठवड्यात किरकोळ बाजारात ८० रुपये प्रातिकिलो मिळणारे टोमॅटो १०० रु. प्रतिकिलोने विकले जात आहेत.

हेही वाचा >>> लाडकी बहीण योजनेसाठी पनवेल पालिकेचे तीन फिरते मदत कक्ष

बंगळूरुमधून होणारी टोमॅटोची आवक पूर्णत: बंद असून नाशिक, सांगली येथील आवक असून कमी माल दाखल होत आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात आवक कमी झाली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

एपीएमसी बाजारात बुधवारी अवघ्या ३३ गाड्याच दाखल झाल्या असून १८०४ क्विंटल टोमॅटो आवक झाली आहे. निम्मीच आवक झाल्याने टोमॅटोच्या दराने उसळी घेतल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमधील किरकोळ भाज्यांचे दर चांगलेच कडाडले असून त्यात आता टोमॅटोही महाग होत आहे.

एपीएमसी बाजारात पावसामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी होत आहे. बाजारात केवळ महाराष्ट्रातून टोमॅटो दाखल होत आहेत. ५० टक्के आवक घटली आहे. त्यामुळे दर वधारले आहेत. – लक्ष्मण पानसरे, व्यापारी, एपीएमसी

Story img Loader