किरकोळ आणि घाऊक या दोन्ही बाजारात टोमॅटो चांगलेच महाग झाले आहेत. परराज्यातून आणि महाराष्ट्रातुन होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव वधारले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात काल प्रतिकिलो १८-२८रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटो आज गुरुवारी बाजारात २८-४०रुपयांनी विक्री होत आहेत तर किरकोळ बाजारात ६०रुपये किलो दराने उपलब्ध आहेत.
वाशीतील एपीएमसी बाजारातच टोमॅटो कमी प्रमाणात दाखल होत आहे. परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे दरवाढ झालेली आहे.

घाऊक बाजारामध्येच २८-४० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहे. बाजारात सध्या राज्यातील टोमॅटो दाखल होत असून बंगळुरूवरुन होणारी आवक ही पूर्णतः बंद आहे. त्याठिकाणी ही मालाचे दर वधारले असल्याने बाजारात टोमॅटो दाखल होत नाही. आधी बाजारात टोमॅटोच्या ४०-५०गाड्या दाखल होत होत्या, मात्र आता उत्पादन कमी झाले आहे. एपीएमसीत ५०%आवक असून टोमॅटोच्या २०-२५ गाड्या दाखल होत आहेत. मध्यंतरीच्या कालावधीत टोमॅटोला कवडी मोल बाजारभाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादनाकडे अधिक लक्ष न दिल्याने उत्पादन कमी आहे,असे मत व्यापारी शशिकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Story img Loader