नवी मुंबई : माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक ३४ मागे घेण्यासंदर्भात विविध माथाडी कामगार संघटनांच्या वतीने १४ डिसेंबरला राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. मात्र नागरपूर हिवाळी आदिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मिळालेल्या आश्वासनानंतर उद्याचा (ता. १४) संप स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. संप रद्द नव्हे तर स्थगित करून पुढे ढकलण्यात आल्याचे कामगार नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
सुधारित माथाडी विधेयक हे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या जीवावर येणार आहे. याबाबत अनेकदा प्रयत्न करूनही अनेक वेळा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बोलणं करूनही त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. म्हणून १४ डिसेंबरला राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षारक्षक सुधारणा विधेयक २०२३ विधिमंडळात सादर करण्यात आले होते. या विधेयकात अनेक तरतुदी या प्रामाणिक काम करणाऱ्या माथाडी कामगारांना जाचक तर बाकडा युनियनसाठी फायद्याच्या ठरत होत्या. त्याला माथाडी नेत्याकडून विरोध झाल्यावर ते सभागृहाच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवले आहे. माथाडी संघटनांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी सरकार वेळ देत नव्हते, तसेच त्याबाबत गांभीर्य नव्हते असा आरोप करीत हा संप पुकारण्यात आला होता. मात्र नागपूर येथील हिवाळी आदिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत साधक बाधक चर्चा झाली त्यामुळं तूर्तास संप स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विधानभवनात याबाबत पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, कामगार आयुक्त, गृह व उद्योग विभागाचे प्रधान सचिव, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार निरंजन डावखरे, आमदार भाई जगताप, आमदार प्रवीण दटके, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, पोपटराव देशमुख, अविनाश रामिष्टे, बळवंतराव पवार, प्रकाश पाटील, अरुण रांजणे, राजन म्हात्रे, हनुमंत बहिरट, राजकुमार घायाळ, तुषार वाडीया आदी उपस्थित होते.