उरण तालुक्यातील चिरनेर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा आणि त्याचा त्या दृष्टीने विकास करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. या परिसराला निसर्गाचे वरदान लाभले आहे. येथे प्राचीन गणेश मंदिर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यसंग्रमात गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या कायदेभंग चळवळीत १९३०ला येथे सर्वात मोठा जंगल सत्याग्रह झाला. या संग्रामात आठ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्या शौर्यशाली लढय़ाचीही ही भूमी आहे.

चिरनेर परिसरातील स्मारकांना अभिवादन करण्यासाठी देशातील नागरिक येतात. या परिसराला पर्यटनाचा दर्जा देऊन विकास करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे, मात्र केवळ आश्वासनांवर येथील नागरिकांची बोलवण केली जात आहे. ही मागणी मान्य होऊन विकास झाल्यास या परिसराचा कायापलट होण्यास मदत होईल.

उरण तालुक्यातील ज्या लढय़ामुळे उरणचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे, तो परिसर म्हणजे चिरनेर. उरण-पनवेल तसेच मुंबई-पुणे व मुंबई-गोवा आदी भागांना जोडणारा हा भाग आहे. जंगल व शेती असल्याने परिसर निसर्गाने नटलेला आहे. उंचच उंच डोंगरांतील शिवारे वर्षभर हिरवीगार असतात. चिरनेर भागातील शेतकरी विविध प्रकारचे प्रयोग करत आहेत. या प्रयोगशील शेतकऱ्यांनी याच भागात उसाचे पीक घेतले आहे. तसेच गतवर्षी एका शेतकऱ्याने येथे कलिंगडाचे पीक घेतले. त्यातून एक नवा मार्ग येथील शेतकऱ्यांना गवसला आहे. याच चिरनेरमध्ये वालाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. त्यातूनच हिवाळ्यात वालाच्या शेंगाची पोपटी केली जाते. या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी देशाच्या विविध भागांतील पर्यटक आणि खवय्ये येथे येतात. आता काही परदेशी पाहुणेही पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी चिरनेरला येऊ लागले आहेत. त्यामुळे चिरनेर पर्यटनाच्या नकाशावर स्वतचे स्थान निर्माण करू लागले आहे.

चिरनेरमध्ये प्राचीन गणेश मंदिर आहे. या मंदिरात संकष्टी चतुर्थीला शेकडो भाविक जमतात. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या मंदिरासमोरच एक भलं मोठं तलाव आहे. तर बाजूलाच चिरनेर जंगल सत्याग्रहातील हौतात्म्याच्या स्मृतींचे जतन करण्यासाठी उभारलेले स्मारक आहे. शासनाकडून बांधण्यात आलेले सुंदर स्मारकही येथे आहे. जिल्हा परिषदेने स्मारक परिसरात चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे समारकही उभारले आहे. या स्मारकाला भेट देणाऱ्या पर्यटकांना स्वातंत्र्यलढय़ाचे महत्त्व समजते. दरवर्षी २५ सप्टेंबरला चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शेकडो नागरिक येथे उपस्थित राहतात.

येथील आक्कादेवीच्या माळरानावर २५ सप्टेंबर १९३०ला जंगल सत्याग्रह झाला. या सत्याग्रहात कष्टकरी, शेतकरी तसेच इतर अनेक समाज घटकांतील नागरिक सहभागी झाले. या आक्कादेवीच्या माळरानावर एक बंधारा आहे. त्या बंधऱ्यावर पावसाळ्यात पर्यटक मोठय़ा संख्येने येतात. येथील ओढय़ाच्या खळखळात्या, नितळ पाण्याचा आनंद ते घेतात.

वाढत्या शहरीकरणामुळे जंगलात वास्तव्य करणाऱ्यांच्या जीवनशैलीची माहितीही शहरी रहिवाशांना नसते. त्यांच्या जीवनाचे दर्शनही या भागात घडते. याच पाडय़ावर आदिवासी वस्ती आहे. त्यामुळे आक्कादेवीच्या माळावर आलेल्या पर्यटकांना हुतात्म्यांना अभिवादन करतानाच, निसर्गाचा आनंद घेता येतो आणि आदिवासींचे जनजीवनही जाणून घेता येते.

त्यामुळे चिरनेर परिसरात पर्यटनासाठी आवश्यक सोयी निर्माण झाल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल व या परिसरालाहा महत्त्व प्राप्त होईल, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी कधी पूर्ण केली जाणार, याची प्रतीक्षा चिरनेर परिसरातील रहिवाशांना आहे.

कलाकारांचे गाव

चिरनेर कलाकारांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. येथे घडवल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीना राज्याच्या विविध भागांतून मागणी असते. येथील कारखान्यांत मातीच्या, पर्यवरणस्नेही मूर्ती घडविल्या जातात. कुंभारवाडय़ात तयार करण्यात येणाऱ्या मातीच्या भांडय़ानाही चांगली मागणी आहे. पावसाळ्यात या भागाला पर्यटक मोठय़ा संख्येने भेट देतात.

Story img Loader