दोन वर्षांच्या करोना काळात पर्यटकच नसल्याने जागतिक ख्यातीच्या शिव लेण्या असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटावरील स्थानिक नागरिक व व्यवसायिक यांच्यावर ही परिणाम झाला होता. मात्र, सध्या करोनाचा प्रभाव कमी झाल्याने बेटावर दररोज मुंबईतून येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिकांचे व्यवसाय पूर्ववत सुरू होऊन जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना काळामध्ये दोन वर्षे पर्यटन बंदीमुळे येथील व्यवसाय पूर्णतः बंद झाले होते. यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. करोना काळानंतर व्यवसायाला पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळाल्याने घारापुरी येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
कोरोना काळात घरातील दागिने विकावे लागले
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे घारापुरी बंदर हे येथील लेण्यांमुळे प्रसिद्ध आहे. तर येथील जनजीवन येथे येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून आहे. छोट्या दुकानांमधून भेटवस्तू, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, शीतपेय विक्री करून येथील नागरिक आपला उदरनिर्वाह करत असतात. मात्र कोरोना काळामध्ये पर्यटकांना बंदी असल्याने दोन वर्षे येथील व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला होता. यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. आपल्या घरातील दागिने विकण्याची वेळ या नागरिकांवर आली होती. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून येणाऱ्या मदती स्वीकारून कसाबसा आपल्या संसाराचा गाडा हाकून कोरोना काळातील दोन वर्षे खडतर जीवन जगण्याचा प्रयत्न येथील नागरिकांनी केला आहे. मात्र आता येथील पर्यटन पुन्हा पूर्वपदावर येत असल्याने, येथील नागरिकांचे व्यावसायिक जीवन स्थिरावण्याची संधी मिळाली आहे. व्यावसायाला पुन्हा सुरुवात झाली असताना कोरोना काळातील आठवणी विचारल्या असता या व्यावसायिकांच्या चेहर्यावर ” कभी खुशी, कभी गम” हे भाव पाहायला मिळत आहेत.
व्यवसाय आणि पर्यटन वाढीसाठी प्रयन्त होणे गरजेचे
घारापुरी म्हणजेच एलिफंटा हे बंदर पूर्णतः पर्यटनावर आधारित असून, येथील नागरिक पर्यटनातून निर्माण होणाऱ्या व्यवसायावर अवलंबून आहेत. यामुळे येथील व्यवसायाच्या दृष्टीने तसेच पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रयन्त होणे गरजेचे असल्याच्या भावनाही येथील नागरिक व्यक्त करत आहेत.