नवी मुंबई : नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला असून सीवूड्स उपनगरात सीवूड्स रेल्वे स्थानकाच्यावरील भागात असलेल्या नेक्सस सीवूड्स ग्रॅन्ड सेन्ट्रल मॉलमुळे या परिसरात पूर्व पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा पार्किंग होत आहे. सीवूड्स येथील वाहतूक नियंत्रण कक्षाद्वारे प्रथमच घेण्यात आलेल्या टोईंग व्हॅनला कारवाईसाठी कधी मुहूर्त मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बेकायदा पार्किंगवर कारवाईसाठी २००९ पासून सीवूड्स वाहतूक चौकीकडे कारवाईसाठी टोईंग व्हॅनच नव्हती. परंतु आता टोईंग व्हॅन चौकीबाहेर आणली असून अद्याप कारवाईसाठी वाहतूक विभागाला मुहूर्त मिळेना असे चित्र आहे. सीवूड्स रेल्वेस्थानकावरच असलेल्या मॉलमुळे येथे रेल्वेप्रवाशांबरोबरच मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्याही खूप मोठी असते. त्यामुळे या स्थानकाच्या दोन्ही दिशेच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर कायम बेकायदा पार्किंग असते. त्यामुळे स्थानकाच्या आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांनाही आपल्या सोसायटीमध्ये जाताना बेकायदा वाहनांच्या पार्किंगमधून गर्दीतून घर गाठावे लागते.
याच विभागात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सीवूड्स सेक्टर ४८ येथील गायमुख चौकात ऑगस्ट २००९ मध्ये वाहतूक नियंत्रण चौकी सुरू करण्यात आली. जवळजवळ १४ वर्षांनंतर या वाहतूक नियंत्रण चौकीला टोईंग वाहन मिळाले असले तरी ते दोन महिने चौकीबाहेर धूळ खात पडून आहे.
सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूला सातत्याने वाहतूककोंडी होत असते. मॉलमुळे या परिसरातून नीट चालायलाही मिळत नाही. वाहतूक पोलीस चौकीबाहेर २ महिन्यांपासून टोईंग वाहन उभे आहे. परंतु त्याला मुहूर्त मिळेना, स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाने हे टोईंग वाहन तत्काळ सुरू करावे. – सुमित्र कडू, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, पदाधिकारी, नवी मुंबई</p>
हेही वाचा – उरणमध्ये नववर्षानिमित्त चोख बंदोबस्त
सीवूड्स येथील वाहतूक पोलीस चौकीसाठी टोईंग वाहन प्राप्त झाले आहे. सीवूड्स परिसरात मोठ्या प्रमाणात दुतर्फा वाहनांची गर्दी असते. टोईंग वाहन सुरू करण्याबाबतचे वरिष्ठांचे आदेश मिळताच टोईंग वाहन सुरू करून त्याद्वारे कारवाई करण्यात येईल. – कृष्णा धामापूरकर, वरिष्ठ वाहतूक निरीक्षक, सीवूड्स