नवी मुंबई: वाशी आणि तुर्भे या दोन उपनगरांच्या वेशीवर असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या कांदा-बटाटा बाजाराच्या पुनर्वसन प्रकल्पात एक हजार चौरस फुटाचे गाळे मिळावेत यासाठी येथील व्यापाऱ्यांनी आग्रह धरला आहे. बुधवारी झालेल्या समितीच्या संचालक मंडळात नव्या पुनर्वसन प्रकल्पाच्या प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सध्या असलेल्या गाळ्यांपेक्षा ६५० चौरस फुटांचे वाढीव गाळे व्यापाऱ्यांना द्यावेत अशा स्वरुपाचे नियोजन करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, हे गाळे मोफत मिळावेत ही व्यापाऱ्यांची मागणी यापूर्वीच मान्य करण्यात आली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा सन २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला. या बाजारांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या व्यापारी संकुलांच्या बांधकामांचे संरचनात्मक लेखा परीक्षण करणे, खंगलेल्या व्यापारी गाळ्यांच्या पुनर्बांधणीसाठी हालचाली करणे अशाप्रकारे पुनर्बाधणीच्या दिशेने या अर्थसंकल्पाचा सुर दिसून आला. या बैठकीतच धोकादायक जाहीर झालेल्या कांदा बटाटा बाजार संकुलाच्या पुनर्विकासाचा मुद्दाही पुढे आला, शिवाय यासंबंधीच्या प्राथमिक आराखड्याचे सादरीकरणही करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
कांदा बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांनी पुनर्विकासात आता जशी कांदा बटाटा बाजाराची बांधणी आहे तशीच बांधणी भविष्यातही असावी आणि ६५० फुटा ऐवजी एक हजार फुटांचा प्रशस्त गाळे मिळावेत, अशी मागणी केल्याचा मुद्दाही प्रशासन आणि संचालकांच्या वतीने यावेळी मांडण्यात आला.
संकुलाच्या पुनर्बांधणीच्या हालचाली वेगाने
कांदा-बटाटा बाजार आवारातील व्यापारी संकुलाच्या इमारती २००५ पासूनच धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. या संकुलात एकूण २३४ गाळे आहेत. गेली अनेक वर्षे या बाजार संकुलाच्या पुनर्विकासाची चर्चा सुरू आहे. मध्यंतरी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी या गाळ्यांची पहाणी केली आणि पुनर्विकासाचे आदेश दिले. त्यानंतर अर्थसंकल्पातही या पुनर्विकासासाठी आवश्यक असणारी प्राथमिक तरतूद करण्यात आली. त्यामुळे बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कांदा बटाटा पुनर्विकासाच्या सादरीकरणाला प्राधान्य देण्यात आले होते.
मोठे गाळे, प्रशस्त संकुल
कांदा बटाटा संकुलातील व्यापाऱ्यांनी सध्या स्थितीत जशी कांदा बटाटा मार्केटची उभारणी आहे, भविष्यातही तशीच राहावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हा पुनर्विकास करताना त्याचा आराखडा तळमजला आणि पहिला मजला असाच असेल या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. कांदा बटाटा बाजारात एकूण २३४ गाळे असून प्रत्येकी गाळे ६५० चौरस फुटाचे आहेत. पुनर्विकासात येथील व्यापाऱ्यांनी एक हजार चौरस फुटाचा गाळा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यासाठी व्यापारी कोणताही अतिरीक्त आर्थिक गुंतवणूक करण्यास तयार नाही आणि ही भूमिका समितीने यापुर्वीच मान्य केली आहे. प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यात एक हजार फुटांच्या गाळ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
येत्या १५ दिवसांत निर्णय मार्गी लागेल
संचालक मंडळाच्या बैठकीतील चर्चेनंतर गुरुवारी पुन्हा व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत पुनर्विकासाचा आढावा घेण्यात आला. याबाबत बैठका सुरूच राहतील . येत्या पंधरा दिवसात निर्णय मार्गी लागण्याची शक्यता आहे, असे मत कांदा बटाटा बाजाराचे संचालक अशोक वाळुंज यांनी व्यक्त केले आहे.