लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : दोन तुल्यबळ फुटबॉल क्लब संघातील सामना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील मैदानात ६ एप्रिलला रंगणार आहे. या वेळी मोठ्या प्रमाणात फुटबॉलप्रेमींची तसेच अनेक अतिमहत्वाच्या व्यक्तींची उपस्थिती असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्यामुळे सुरक्षा कारणास्तव मैदान परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

६ एप्रिलला नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील मैदानात रियल माद्रिद लिजण्ड्स विरुद्ध एफ सी बार्सिलोना लिजण्ड्स (Real Madrid Legends Vs FC Barcelona Legends) या दोन जगप्रसिद्ध फुटबॉल क्लबच्या माजी खेळाडूंमध्ये सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी मैदानात येणारे खेळाडू व महत्त्वाच्या व्यक्तींचा ये-जा करण्याचा मार्ग मैदान नजीकच्या भीमाशंकर सोसायटी ते एल. पी. रिक्षा स्टॅण्ड या दरम्यानच्या सेवा मार्ग आणि एलपी उड्डाणपूल ते शनिमंदिर कमान भीमाशंकर मागील सेवा मार्ग हे निश्चित करण्यात आला आहे.

रहेजा युनिव्हर्सल व माइंडस्पेस हे पार्किंगकरिता निश्चित करण्यात आले आहे. येथील सेवा मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव व वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता नागरिकांच्या वाहनांना ये-जा करण्यास व वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार ६ तारखेला सकाळी सात ते रात्री अकरा दरम्यान डॉ. डी. वाय. पाटील मैदान समोरील सेवा मार्ग (भीमाशंकर सोसायटी ते एल. पी. रिक्षा स्टॅण्ड) अन्य वाहनांना प्रवेश आणि पार्किंग बंदी करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग म्हणून शीव-पनवेल महामार्ग रस्त्यावरून उरण फाटा ते एल. पी. ब्रिज दरम्यानचा रस्ता वापरता येईल तसेच एलपी उड्डाणपूल ते छ. शिवाजी चौक, ते शनिमंदिर कमान शनिमंदिर ते भीमाशंकर या मार्गावर वाहनांना वाहतूक आणि पार्किंगसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्या ऐवजी नेरुळ स्टेशन मार्गे छ. शिवाजी चौक येथून डावे वळण घेऊन पामबीच मार्गे मार्गस्थ होता येईल. याशिवाय उरण फाटा उड्डाणपुलाखालून पोलो रुग्णालय येथून उजवे वळण पुढे जाऊ शकतात.

या शिवाय रहेजा कॉर्नर शिरवणे ते पुण्यनगरी या एमआयडीसीतील सेवा मार्गावर वाहनांना ये-जा करण्यास व वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या ऐवजी शीव-पनवेल महामार्गाचा वापर ते करू शकतात. या अधिसूचनेतून जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने तसेच पोलीस वाहने, अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका, शासकीय वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना तसेच सदर फुटबॉल क्लबमधील व्यवस्थापनाचे अधिकृत पासधारक वाहनांना वगळण्यात आले आहे.