नवी मुंबई : शीव-पनवेल राज्य महामार्गावरील सानपाडा येथील पादचारी पुलास सुमारे महिन्याभरापूर्वी एका डम्परने धडक दिली होती. या अपघातामुळे पूलाचे नुकसान झाले. या पुलाच्या दुरुस्तीचे काम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ६ मार्चला हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या पादचारी पुलाखालून होणाऱ्या वाहतुकीमध्ये बदल करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. पादचारी पूलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील वाहतूक सुरळीत होणार आहे.
शीव-पनवेल राज्य महामार्गावरून दिवसाला हजारो जड वाहने आणि हलकी वाहने वाहतूक करतात. त्यामुळे नवी मुंबई, मुंबईसाठी ही मार्गिका अत्यंत महत्त्वाची आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा यासाठी सानपाडा भागात पादचारी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. ८ फेब्रुवारीला मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास डम्पर वाहतूक करत असताना या डम्परचा वरील भाग पादचारी पूलाला धडकला. त्यामुळे पादचारी पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पादचारी पूलाभोवती असलेली धातूची संरचना आणि कठडा देखील तुटला आहे. या अपघातानंतर कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पादचारी पूल नागरिकांना ये-जा करण्यासाठी बंद केला होता.
वाहतूक पाम बीच मार्गे
सार्वजनिक बांधकाम विभागाने या पादचारी पुलाच्या दुरुस्तीचे काम ६ मार्चला हाती घेतले आहे. त्यामुळे ६ मार्चला रात्री ११ ते ७ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत येथे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहे. त्यानुसार, वाशी येथून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक पाम बीच मार्गे वळवून पुन्हा शीव पनवेल मार्गावरून केली जाणारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.