नवी मुंबई : वाशी सेक्टर १९ वाशी येथील ट्रक टर्मिनलची जागा ही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध बाजार आवारांत येणाऱ्या शेतमालाच्या वाहनांच्या पार्किंगकरिता होती. मात्र या ठिकाणी सिडको प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गृहनिर्माण योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे बाजार आवारात मोठमोठ्या वाहनांचे रस्त्यालगतच दुहेरी पार्किंग सुरू आहे. एपीएमसी बाजार आवारात वाहतूक कोंडी समस्या भेडसावत असून दिवसेंदिवस येथील पार्किंगची समस्या बिकट होत चालली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजाराच्या विस्तीर्ण आवारात पाच बाजारपेठा आहेत. या ठिकाणी शेतमाल घेऊन दररोज १५ ते २० हजार ट्रक येत असतात. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सिडकोमार्फत सेक्टर १९ येथे भव्य असे ट्रक टर्मिनल उभारण्यात आले होते. मात्र या ट्रक टर्मिनलच्या जागेत आता सिडकोमार्फत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारात आता ट्रक उभे करण्याची समस्या भेडसावत असून बाजारात आणि बाजार आवाराबाहेर वाहने उभी करण्यासाठी ‘चिरीमिरी’ घेण्याचे प्रकार सुरू आहेत.
हे ही वाचा… बेलापुरात झाडाझडती, ऐरोलीकडे पाठ; भाजप, रा. स्व. संघाची रणनीती
बाजारात वाहने उभी करण्यासाठी एपीएमसीत पैसे घेऊन वाहने उभी करण्यासाठी परवानगी दिली जाते. तर बाजाराबाहेर वाहने उभी करतानाही पैसे मोजावे लागतात तसेच ट्रकमधील साहित्याची चोरी होण्याच्या घटना घडतात. बाजाराच्या बाहेरील रस्त्यालगतच अवजड वाहनांचे दुहेरी पार्किंग केली जाते. त्यामुळे परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी समस्या उद्भवत आहे.
हे ही वाचा… एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
एपीएमसी’ बाजारांमध्ये दररोज पंधरा ते वीस हजार मोठ्या वाहनांची वर्दळ असते. मात्र सिडकोने आरक्षित ठेवलेल्या ट्रक टर्मिनलच्या जागी गृहनिर्माण संकुल उभारण्यात येत आहे. त्यामुळे येथील वाहन पार्किंगची समस्या अधिक जटिल होत असून वाहनधारकांची आर्थिक लूटदेखील होत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. – मनोहर तोतलानी, व्यापारी, एपीएमसी