पनवेल: कळंबोली वाहतूक शाखेच्या पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणा-या कपास महामंडळाच्या गोदामालगतच्या सेवा रस्त्यावर सिमेंट वाहतूक करणा-या ट्रकची बेकायदा दुहेरी रांगा लागत असल्याने या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना सतत इतर वाहनातील प्रवाशांना करावा लागतो. वाहतूक नियमन करणा-या पोलीसांच्या देखत हा सर्व प्रकार सूरु असल्याने नेमके पोलीस करतात काय, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.
कळंबोली लोखंड बाजार ते कळंबोली सर्कल या दरम्यान सेवा रस्त्यावर ही वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. कपास महामंडळ, धान्य साठवणूकीचे कोठार (एफ.सी.आय.), सी.सी.डब्ल्यूचे गोदाम अशी मोठी गोदामे या सेवा रस्त्यालगत आहेत. या सेवा रस्त्याचा वापर अवजड वाहने उभी करण्यासाठी चालकांकडून केला जातो. मात्र एकावेळेस एक ट्रक उभ्या करण्याची संधी मिळाल्याने ट्रकचालक एकावेळी दोन ते तीन ट्रक एकाबाजूला एक उभे कऱतात. त्यामुळे ३० फुटी रुंदीचा सेवा रस्ता १० फूटी होतो. यापूर्वी या रस्त्यावर अशाचप्रकारे ट्रक उभे केले जात असल्याने कळंबोली वाहतूक शाखेचे तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरिक्षक निशिकांत विश्वकार यांच्या कारकिर्दीत कळंबोली वाहतूक शाखेच्या पोलीसांनी वाहनांवर दंडात्मक आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सातत्याने केली. या कारवाईमुळे ट्रकचालकांना काही प्रमाणात शिस्त लागली होती.
हेही वाचा… पनवेल: पर्यावरण रक्षणासाठी रात्रपाळीत दिडशे पालिका कर्मचा-यांचे काम
मात्र वरिष्ठ पोलीस निरिक्षक विश्वकार यांच्या बदलीनंतर पोलीसांची कारवाई थंडावल्याने पुन्हा ट्रकचालक कपास महामंडळ ते सीडब्ल्यूसी या गोदामाच्या प्रवेशव्दारापर्यंत दोन ते तीन रांगेत ट्रक उभे करतात. यामुळे कळंबोली सर्कलकडे जाणा-या सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना नेहमी करावा लागतो. याबाबत कळंबोली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक हरिभाऊ बानकर यांना विचारले असता त्यांनी लोखंड बाजारातील अंतर्गत सेवा रस्त्यांवर जानेवारी ते २२ सप्टेंबरपर्यंत वाहतूक पोलीसांनी ११ हजार ८८३ चालकांवर दंडात्मक कार्यवाही केल्याची माहिती दिली. तसेच वेळोवेळी लोखंड बाजारातील वाहतूकदार, व्यापारी यांच्या बैठका घेऊन त्यांना सुद्धा याविषयी रहदारीस अडथळा करु नये अशा सूचना दिल्या मात्र शेकडो वाहन व चालकांवर कारवाई करुनही शिस्त पाळली जात नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बानकर यांनी सांगीतले. यापूढे वाहतूक पोलीस विभाग नियमभंग करणा-या चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा पोलीस अधिकारी बानकर यांनी दिला.