नवी मुंबई : गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या तुर्भे रेल्वे स्थानकासमोरील रस्त्याचा प्रश्न अखेर उड्डाणपुलाच्या मार्गाने मार्गी लागला आहे. याचे काम नुकतेच सुरु करण्यात आले खरे मात्र पहिल्या तीन दिवसांत वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण झाले. शनिवारी जवळपास रात्रभर पोलीस उपायुक्त स्वत: या ठिकाणी उपस्थिती होते. ही परिस्थिती नेहमी राहणार नसून एक-दोन दिवसांत वाहतूक बदल लक्षात येऊन कोंडी सुटेल अशी अपेक्षा वाहतूक पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
तुर्भे स्थानकासमोरील उड्डाणपुलाचे काम शुक्रवारपासून सुरु झाले. त्यामुळे अवजड वाहनांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करण्यास बंदी घालण्यात आली तर ३ पर्यायी मार्गही देण्यात आले. त्यात नेहमीच मार्गात बदल केल्यावर सुरुवातीचे काही दिवस तारेवरची कसरत वाहनचालक आणि पोलिसांनाही करावी लागते. मात्र शुक्रवारी काम सुरू झाले आणि शनिवार-रविवार लागून सुट्ट्या तसेच सोमवारी नाताळ अशा सलग तीन सुट्ट्या आल्याने वाहतुकीत प्रचंड वाढ झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी पर्यायी मार्ग आणि या ठिकाणी सुद्धा झाली होती. शनिवारी आणि रविवारी रात्री तर पावणेच्या पुढे वाहनांची रांग गेली होती. स्वत: पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे हे रात्री आठ ते पहाटे चार पर्यंत याच भागात पाहणी करीत होते व योग्य ते निर्देश देत होते. सुरुवातीचे काही तास सोडले तर रात्रभर वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. तर रविवारी दुपारी आणि रात्रीही सुट्टीसाठी बाहेर जाणाऱ्या वाहनाच्या संख्येत घट आल्याने वाहतूक कोंडी फारशी झाली नाही.
हेही वाचा >>>वाशी खाडी पुलासाठी निधी उभारणीला वेग; पैशांची निकड पाहून सिडकोकडून २०० कोटींची वेगाने वसुली?
शनिवार आणि रविवार रात्री वाहनांची संख्या वाढल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली मात्र पोलीस बंदोबस्त असल्याने जेथे जेथे वाहतूक कोंडी होत होती तेथील वाहतूक कोंडी तात्काळ सोडण्यात येत होती. वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार मनपाने ठिकठिकाणी मार्गात बदल असल्याचे फलक लावलेले आहेत. ज्या ठिकाणाहून मार्ग बदल आहेत अशा ठिकाणी मार्ग दाखवण्यासाठी वाहतूक पोलीस पथकही कार्यरत आहे. ही परिस्थिती काही दिवसांत निवळेल आणि वाहतूक नियमित होईल. –तिरुपती काकडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग
हेही वाचा >>>पनवेल शीव महामार्गावर वाहनांच्या रांगा
आतापर्यंत २० बळी, ४० हून अधिक नागरिक जायबंदी
तुर्भे स्टेशन पासून तुर्भे स्टोअर कडे येण्यासाठी ठाणे बेलापूर मार्ग ओलांडताना आता पर्यंत २० पेक्षा अधिक बळी ४० पेक्षा जास्त लोकांना कायम अपंगत्व आले आहे. त्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी सोय करण्याच्या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. शेवटी २० वर्षांनी उड्डाणपूल उभा राहत आहे.