नो पार्किंग जागेतच बेकायदा पार्किंग करणाऱ्याला चाप
नवीन वर्षाचे स्वागत करण्याची व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शहरात उत्साहाचे वातावरण मागील आठवड्यापासून पाहायला मिळत होते.याच नव्या वर्षाच्या निमित्ताने वाहने खरेदी करण्यासाठीचा नागरीकांचा कल पाहायला मिळतो. परंतू शहरातील विविध भागात असलेली दुचाकी व चारचाकी वाहनविक्री करणाऱ्या दुकानदारांनी अशी विक्रीची वाहने रस्त्यावरच उभे केल्याचे सीवूड्स विभागात पाहायला मिळत होते.त्यामुळे रस्ते बेकायदा वाहनविक्रीच्या पार्किंगसाठी की नागरीकांसाठी असा प्रश्न निर्माण झाला होता.त्याबाबत लोकसत्ताने बातमी प्रसिध्द करताच वाहतूक विभागाने रस्त्यावरील नव्या विक्रीसाठीच्या गाड्या हटवण्यात आल्या आहेत.परंतू आता सर्वत्रच वाहतूक विभागाने अशा बेकायदा वाहन पार्किंगवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : युवतीची तक्रार न घेणारा ‘तो’ पोलीस अधिकारीही निलंबित
नियोजनबध्द वसवलेल्या नवी मुंबई शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील होत असून शहरातील नो पार्किंग जागेतच पार्किंगची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. पार्किंगसाठी जागाच अपुऱ्या पडत असल्याने नो पार्किंगच्या ठिकाणीच वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गाड्या पार्क करायच्या तरी कुठे असा प्रश्न पडत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नवी मुंबईतील बेलापूर ते दिघा या सर्वच उपनगरात पार्किंगचा प्रश्न अधिक जटील बनला आहे.त्यातच नवीन २०२३ च्या आगमनाच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. शहरातील चारचाकी वाहनांचे तसेच दुचाकी वाहन विक्रीची मोठे शोरुम तसेच शहराअंतर्गत विविध ठिकाणी दुकाने असून नववर्षाच्या सुरवातीलाच वाहन खरेदीसाठी नागरीकांचा उत्साह असतो.त्यामुळे शहरातील वाहन विक्री दुकानांच्या बाहेर रस्त्यावरच या गाड्या बेकायदेशीरपणे उभ्या असल्याचे चित्र होते.परंतू वाहतूक विभागाने अशा बेकायदा वाहन पार्किंगवर कारवाई करत या वाहनविक्रीसाठीच्या गाड्या हटवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>> नवी मुंबई: शून्य इंधन दिवस योजनेअंतर्गत एनएमएमटीची वर्षभरात अडीच कोटींची बचत
शहरात खाजगी आस्थापना पार्किंगबाबत हात वर करत असल्याने वाहने रस्त्यावरच पार्किंग होत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे पार्किंगचा प्रश्न आगामी काळात अधिक गंभीर होणार असल्याचे चित्र आहे. पालिकेने बेलापूर येथे पार्किंगसाठी बहुमजली पार्किंग निर्मिती सुरु केली असली तरी वाढत्या वाहनांमुळे शहरात पार्किंगचा प्रश्न आगामी काळात अधिकच गंभीर व जटील होणार आहे.
नवी मुंबई शहरात नववर्षानिमित्त वाहनविक्रीसाठी आणलेल्या गाड्या रस्त्यावरच पार्क केल्या गेल्या होत्या अशा रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्या हटवण्यात आल्या आहेत.नो पार्किंग जागेत गाड्या उभ्या केल्या तर कारवाई केली जाणारच आहे.त्यामुळे नागरीकांनी नियमांचे पालन करावे.
तिरुपती काकडे ,उपायुक्त वाहतूक विभाग