कुठेही थांबा; एसटी स्थानक, रेल्वे प्रवेशद्वारावर अतिक्रमण
पनवेल शहरात फक्त चार अधिकृत रिक्षांचे थांबे असताना कुठेही रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. विशेष म्हणजे पोलीस याकडे डोळेझाक करीत असल्याने रिक्षा थेट बस स्थानक व रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वारही अडवीत आहेत.
पनवेल एस.टी. स्थानकाजवळ तसेच परिसरात अनेक अनधिकृत रिक्षा वाहनतळ निर्माण झाली आहेत. ३० ते ३५ फुटांच्या रस्त्याचा निम्मा भागावर रिक्षाच उभ्या असतात. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. एस.टी स्थानकाच्या प्रवेशद्वारातून तसेच आंबेडकर चौक, शिवाजी चौक, ठाणा नाका, स्टेशन रोड येथे अनधिकृत रिक्षा थांब्यामुळे नेहमीच कोंडी झालेली पाहावयास मिळते. याबाबत नागरिकांनी अनेक तक्रारी वाहतूक विभागाकडे केल्या आहेत. मात्र दखल घेतली जात नाही.
पनवेलमध्ये फक्त चार रिक्षा थांबे हे अधिकृत आहेत. यामध्ये स्टेशन रोड, सोसायटी नाक, पनवेल एस.टी स्टॅण्ड व विसावा हॉटेल. पनवेल एस.टी स्थानकासमोरून तसेच आंबेडकर चौकातून ग्रामीण भागात ज्या सहा आसनी रिक्षा जातात त्या अनधिकृत थांब्यावर थांबविल्या जातात. एस.टी. स्थानकासमोर पुलाखाली तर रस्ता अडवून रिक्षा थांबलेल्या असतात. त्यामुळे येथे सकाळी आठ ते रात्री अकरा वाजेपर्यंत नेहमीच वाहतूक कोंडी झालेली पाहावयास मिळते.
ठाणा नाक्यावरून पनवेल शहरात जाणारा रस्ता हा धोकादायक असताना तेथे अनधिकृत रिक्षा थांबवल्या जातात. त्यामुळे तेथून इतर वाहनांना मार्ग काढणे अवघड होते. रेल्वे प्रवेशद्वारावर, एस.टी स्थानक प्रवेशद्वाराजवळ व एस.टीच्या स्वच्छता गृहाजवळ रिक्षा आडव्या लावून प्रवासी वाहतूक केली जाते.
वाहतूक शाखेच्या माध्यमातून कुठेही रिक्षा उभ्या करून वाहतूक कोंडीत भर टाकणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू आहे. नागरिकांना त्रास होत असेल तर त्यांनी निर्भीडपणे तक्रार द्यावी. वाहतूक शाखेच्या माध्यमातून तत्काळ कारवाई करण्यात येईल .
-अभिजित मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा