नवी मुंबई : वाशी कोपरखैरणे मार्गावर एन.एम.एम.टी च्या दोन बस केवळ ५० फुटांच्या अंतरावर बंद पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. दोन तासांच्या प्रयत्नांनी बस रस्त्याच्या कडेला घेण्यात आल्यावर वाहतूक कोंडीतून सुटका झाली.
कोपरखैरणे वाशी हा कायम व्यस्त असणारा मार्ग आहे. एखादा छोटा अपघात झाला तरी वाहतूक कोंडी होऊन लांब पर्यंत रांगा जातात. त्यात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास कोपरखैरणेकडून वाशीत जाणाऱ्या मार्गावर ब्ल्यू डायमंड चौकात आणि नजरेच्या टप्प्यात असणाऱ्या कोपरी गाव बस थांब्या जवळ दुसरी बस बंद पडली होती. त्यामुळे काही वेळातच कोपरी गाव बस थांबा ते बोनकोडे पेट्रोल पंपापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर अनेक शाळा आहेत. नेमक्या शाळा सुटण्याच्या वेळेत बस बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.
आणखी वाचा-नवी मुंबईतील ४५०० अनधिकृत बांधकामे पाडणार?
अशा स्थिती अनेक रिक्षा चालक आणि दुचाकीस्वार दोन गाड्यामधून ते पदपथ अशी जागा मिळेल तेथून गाडी पुढे काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यात अनेक जण यशस्वी होऊन मार्गस्थ होत होते तर अनेक जण काही अंतरावर जाऊन वाहतूक कोंडीत अडकत होते. परिस्थितीचे गांभीर्य कळताच वाशी आणि कोपरखैरणे वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एक एक गाडी सोडणे सुरू केले. वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीने बेशिस्त वाहन चालक शिस्तीत गाडी हाकत असल्याने हळू हळू गाड्या पुढे सरकत होत्या. पोलिसांच्याच मदतीने या वाहतूक कोंडीत अडकलेल्या दोन रुग्णवाहिका बाहेर काढून मार्गस्थ करण्यात यश आले.
आणखी वाचा-उरण नगर परिषदेचे कार्यालय आचारसंहितेत अडकणार?
त्यात जी बस कोपरी बस थांब्या नजीक बंद पडली होती त्याचा गिअर बॉक्स निकामी झाल्याने टोइंग करून बाजूला घेणे शक्य नव्हते. शेवटी दीड दोन तासांच्या प्रयत्नांनी बस रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्या आणि वाहतूक सुरळीत झाली. अशी माहिती एका प्रत्यक्ष दर्शीने दिली. याबाबत एनएनएमटी व्यवस्थापक योगेश कडूसकर यांना विचारणा केली असता माहिती घेत योग्य ते पाऊल उचलले जाईल असे सांगितले.