नवी मुंबईत वाहनचालकांचा इंधनावरील पैसा वाया; नागरिकांची कसरत
नवी मुंबईत ठाणे-बेलापूर मार्गावर आणि अंतर्गत असणाऱ्या रस्त्यावर वाहतूक रस्त्यांच्या दोन्ही बाजूने करण्यात येणाऱ्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे कोंडीत अडकल्याने वाहनचालकांचा वेळ आणि इंधन पैसा वाया जात आहे, तर पादचाऱ्यांना रस्ता पार करताना कसरत करावी लागत आहे.
नवी मुंबईत अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा वाहने पार्क केली जात आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूने वाहनधारक गाडय़ा पार्क करत असल्याने याचा फटका वाहतूक यंत्रणेला बसत आहे.
बेकायदा वाहन पार्किंगमुळे या रस्त्यावरून स्कूल बस, रुग्णवाहिका, एनएनएमटीच्या बसेस, रिक्षा चालकांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. तर काही ठिकाणी दुचाकीचीही कोंडी होताना दिसत आहे. वाशी सेक्टर ९, १० सेक्टर १५ व १६ या वसाहतीतील अंतर्गत रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. तर कोपरखरणे भागातील सेक्टर १९ आणि माथाडी वसाहतीतील रस्त्यावरसुद्धा दोन्ही बाजूने वाहने उभी केली जातात त्यामुळे अरुंद असलेले हे रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने कुचकामी ठरताना दिसत आहे. ऐरोली बस आगार आणि स्थानक भागांतही वाहतुक कोंडीचा फटका नागरिकांना बसत आहे. घणसोली, सानपाडा, नेरुळ आणि सीबीडी बेलापूर परिसरातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ठाणे बेलापूर मार्गावर दिघा व तुभ्रे येथील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडल्यामुळे रस्ता हा अरुंद आहे. रस्त्यातच बस थांबा आणि रिक्षा स्टॅण्ड असल्याने आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने पार्किंग करण्यात येत असल्यामुळे सकाळ-संध्याकाळच्या वेळीस वाहतूक कोंडी होत आहे. तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूने करण्यात येणाऱ्या बेकायदा पार्किंगला आळा घालण्याची मागणी नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.