उरण : उरण शहरातील स्वामी विवेकानंद चौक ते वैष्णवी हॉटेल दरम्याच्या वाहतूक कोंडीमुळे गुरुवारी पुन्हा एकदा तासभर शेकडो विद्यार्थी कोंडीत अडकल्याने पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. या वाहतूक कोंडीवर उपाय करण्याची मागणी वारंवार करूनही अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे उरण शहरातील अवघ्या काही मीटर लांबीच्या मुख्य मार्गावरील कोंडीवर उपाय मिळत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

उरण शहरातील हा मुख्य मार्ग आहे. या मार्गावर उरणमधील उरण एज्युकेशन (यु एस) व रोटरी अशी दोन विद्यालये व महाविद्यालये आहेत. येथे शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी दररोज याच मार्गाने ये-जा करतात. दुपारी १२ ते १२.३० वाजताच्या दरम्यान या विद्यालयातील सकाळच्या सत्राचे विद्यार्थी घरी परततात तर दुपारच्या सत्राचे विद्यार्थी विद्यालयात जातात. त्याच वेळी ही कोंडी सुरू होते. यातील अनेक पालक आपल्या दुचाकी किंवा चारचाकी तसेच विद्यार्थी वाहनाने प्रवास करतात. एकाच वेळी शेकडो वाहने ये-जा करतात. त्याचवेळी एखादे वाहन रस्त्यात उभे करून वाहनचालक खरेदीसाठी गेल्याने किंवा वाहन उभे करून मार्ग अडविल्याने वाहतूक कोंडीत अधिकची भर पडत जाते.

हेही वाचा >>>गरजेपोटी घरांची घोषणा निवडणुकांमध्येच का? प्रकल्पग्रस्तांचा सवाल

त्याचबरोबर दुचाकीस्वार आणि पालकही बेशिस्त पद्धतीने रांग मोडून वाहने हाकत या वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. त्यामुळे सायकलने व पायी चालणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनाही पुढे मार्गक्रमणा करणे अवघड होत आहे. याच मार्गावर वैष्णवी हॉटेलजवळ असलेल्या उंचवट्यामुळे वाहनांना वळण घेण्यास अडथळा निर्माण होत असल्याच्या पालकांकडून तक्रारी आहेत. या सर्व समस्यांचा सामना विद्यार्थी, पालक व उरणच्या सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे.

उरण नगर परिषद, वाहतूक विभागाचे दुर्लक्ष

उरण नगर परिषद व वाहतूक विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. येथील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक विभागाचे सहायक (वॉर्डन) तैनात असले तरी बेशिस्त वाहनचालक त्यांना जुमानत नाहीत. या नाक्यावरील वाहतूक कोंडीमुळे उरण शहराच्या बाहेर जाणारी व उरण शहरात येणारी वाहने कोंडीत अडकून रांगा लागत आहेत. या कोंडीवर उरण नगर परिषद आणि वाहतूक विभागाने उपाय करून विद्यार्थी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.