पनवेल : शहरात रविवारी सकाळी वाहतूक कोंडीचा सामना रहिवाशांना करावा लागला. गणेशोत्सवपूर्व तयारीसाठी तालुक्यातील विविध गावातून रहिवाशी खरेदीसाठी पनवेल शहरात येतात. मात्र अरुंद रस्ते, बेशीस्त वाहनचालक आणि वाहतूक पोलीसांचा तुटवडा यामुळे कोंडीचा प्रश्न सुटण्याऐवजी जटील होत चालला आहे.
हेही वाचा >>> पिरवाडी किनाऱ्यावर वाळूत रुतला डम्पर; जलसमाधी मिळता मिळता वाचला
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा असलेल्या चौकात वाहतूक पोलीसांची चौकी आहे मात्र या चौकीत आणि चौकात वाहतूक कोंडी झाल्यावर एकही कर्मचारी वाहतूक नियमनसाठी येथे तैनात नसल्याचे रविवारी सकाळी दिसले. या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेला सुद्धा बसला. शहरातील वाहतूक पोलीस चौकीसमोर पोलीस नसल्याने काही माल गाड्या चौकीसमोर उभ्या केल्या जात असल्याचे दिसले. काही दिवसांपूर्वी रविवारी सुट्टीच्या दिवशी नवी मुंबई पोलीस दलाचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त काकडे यानी स्वतः सुट्टीच्या दिवशी पनवेल शहरातील वाहतूक व कोंडीची ठिकाण, वाहनतळ यांबाबत आढावा घेतला. मात्र त्या आढावा फेरीचा काही लाभ झाल्याचे दिसत नाही. पोलीस विभागाने पनवेल पालिकेला अपुरे मनुष्यबळ असल्याने कोंडीत नियमनासाठी मदतनीस देण्यात मागणी केली. पालिकेने पोलीसांच्या मागणीनंतर सूरक्षा रक्षक मंडळाकडे मागणी केली. अद्याप पालिकेला सूरक्षा रक्षक मंडळाने पालिकेला रक्षक दिले नाहीत. त्यामुळे पोलीसांना अतिरीक्त मनुष्यबळ मिळू शकले नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडीवर लक्ष्य केंद्रित करण्याची वेळ आली आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरातील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी पोलीस मुख्यालयातील कर्मचारी तात्पुरत्या स्वरुपात येथे नेमल्यास हा प्रश्न काही काळापुरता तरी सुटू शकेल.