उरण : विसर्जनासाठी जेएनपीटी बंदरातील कंटेनर वाहने एकाच वेळी उरण पनवेल मार्गावर आल्याने शनिवारी (आज) सकाळी 8 वाजल्यापासून करळ ते जासई या चार किलोमीटरच्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली असून नवी मुंबई तसेच पनवेल परिसरात प्रवास करणाऱ्या चाकरमानी व विद्यार्थी या कोंडीत अडकून पडले आहेत.
उरण पनवेल व नवी मुंबईतील बेलापूरला जोडणाऱ्या करळ ते जासई मार्गावरून एस टी व नवी मुंबई महानगर पालिकेच्या एन एम एम टी च्या बसने प्रवासी प्रवास करीत आहेत. गणेशोत्सवातील सुट्टया संपल्याने आज पासून शाळा,महाविद्यालये सुरू झाली आहेत. उरण तालुक्यातील शेकडो विद्यार्थी दररोज नवी मुंबई व पनवेल मध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवास करीत आहेत. मागील अनेक वर्षांपासून जासई हे या मार्गावरील वाहतूक कोंडीचे ठिकाण बनले आहे.
हेही वाचा : एपीएमसीत बटाट्याच्या अवघ्या ४२ गाड्या दाखल ; वाहतूक कोंडीचा फटका
त्यामुळे येथील कोंडी दूर करण्यासाठी जासई ते शंकर मंदिर दरम्यानच्या उड्डाणपूल उभारला जात आहे. या पुलाचे काम सुरू असल्याने येथील मार्ग वळविण्यात आले आहेत. तसेच रस्त्यातील खड्ड्यामुळेही कोंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवासी सार्वजनिक प्रवासाठी असलेल्या मार्गावरील रस्त्याची काम पूर्ण करण्याची मागणी प्रवाश्यांकडून केली जात आहे. उरण पनवेल मार्गावरील करळ ते जासई दरम्यान एकाच वेळी बंदी घालण्यात आलेली जड वाहने सुरू करण्यात आल्याने कोंडी झाली असून कोंडी दूर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उरण वाहतूक विभागाचे सह पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली आहे.