खोपटे खाडीपूल व गव्हाण दिघोडे मार्गावरील जड कंटनेर वाहनांमुळे येथील नागरिकांना तासन्तासनाच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या सातत्याने होणाऱ्या कोंडीच्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. उरण तालुक्यातील खोपटे पूल हा येथील पूर्व विभागातील नागरिकांच्या प्रवासाचा महत्वाचा मार्ग आहे. मात्र या मार्गावरील जड कंटनेर वाहनांमुळे पुलावर आणि खोपटे परिसरात रस्त्यावर होणारी कोंडी ही नित्याची समस्या बनली आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई: दुर्लक्ष झाकण्यासाठी घाईघाईत स्मशानभूमीची रंगरंगोटी; पालिकेच्या नेरूळमधील कारभाराचा नमुना
सोमवारी सायंकाळी ४ ते ७ अशी चार तास पुलावर कोंडी झाल्याने शेकडो प्रवाशांना या कोंडीत अडकून पडावे लागले होते. तर गव्हाण फाटा ते दिघोडे चिरनेर मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. उरण मधील जेएनपीटी बंदरावर आधारित मालाची साठवणूक करण्यासाठी शेकडो गोदाम आहेत. या गोदामात ये जा करणाऱ्या हजारो कंटनेर वाहनांमुळे ही वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. बेशिस्त वाहतूक आणि गोदामात वाहनतळाचा अभाव यामुळे कोंडीत भर पडली आहे. उरण मधील वाहतूक नियंत्रण करणारी यंत्रणा कमी पडत आहे. यात सुरधारणा करण्याची आवश्यकता असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी वाहतूक नियंत्रण करावी अशी मागणी खोपटे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर यांनी केली आहे.