नवी मुंबई : पनवेल कडून ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुभाजकावर धडकला आणि एका बघून पलटी झाला. सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला तरी सव्वानऊ पर्यंत वाहतूक कोंडी होती. ट्रक बाजूला केल्यावरच अर्ध्या एक तासाने वाहतूक सुरळीत होईल असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
आज सकाळी कर्नाटकचा एक ट्रक सुका मेवा घेऊन ठाण्याच्या दिशेने जात होता. ठाणे बेलापूर मार्गावर घणसोली स्टेशन समोर ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट दुभाजकावर आदळला. ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात सुका मेवा असल्याने वजन जास्त झाल्याने ट्रक एका बाजूने पूर्ण आडवा झाला. ट्रक वेगात असल्याने अपघातात ट्रक समोरील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अपघात होताच प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यात अपघात स्थळापासून गाडी एका बाजूने नेट असताना अन्य वाहन चालक अपघातात आडवा झालेला ट्रक पाहत अत्यंत संथ गाड्या हाकत असल्याने वाहतूक कोंडीतील वाहनांच्या लांबच लांब रांग लागली होती. अपघात बाबत माहिती मिळताच रबाळे वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले.
हेही वाचा : कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
ट्रक मध्ये माल खचाखच भरलेला असल्याने अगोदर माल उतरवणे आणि नंतर रिकामा ट्रक बाजूला घेणे सोपे असल्याने माल उतरवून ट्रक बाजूला घेण्यात येणार आहे. त्या नंतर वाहतूक सुरळीत होईल अशी माहिती उपस्थित वाहतूक पोलिसाने दिली.