‘स्टंट’..तरुणाईचा सध्याचा परवलीचा शब्द. बरं ही कसरत करण्यासाठी लागणारी विशिष्ट जागा तरुणांनी स्वत:च निवडली आहे. ती म्हणजे रस्ते. काही वाहनांनी गजबलेले, तर काही माणसांनी! नवी मुंबईतील पामबीच, सी-शोअर, सागरविहार, कोपरखैरणे, घणसोली सव्र्हिस रोड, ऐरोली पटनी कॅम्पस, ऐरोलीतील जॉगिंग ट्रॅक आणि एमआयडीसी परिसरातील गवळी देव परिसर ही काही ठिकाणं. यातील काही तरुणांचा असा भ्रम झालेला आहे की, हे सारे रस्ते तीर्थरूपांनी त्यांच्यासाठी खुले केले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांची कणभरही भीती न बाळगता ताशी सव्वाशे किलोमीटर वेगाने बाइक दामटल्या जातात. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. ध्वनिप्रदूषणाचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे.
बाईकमध्ये बदल
* बाइकचा योग्य पद्धतीने बसवलेला सायलेन्सर काढून जास्तीत जास्त आवाज करणाऱ्या नळ्यांचा वापर.
* महाविद्यालयीन तरुणांकडे जुन्या बाईकची संख्या जास्त.
* बाइकमध्ये बदल करून कर्कश्श हॉर्न
सूचनांना फाटा
* पोलिसांनी बसवलेल्या फलकांकडे दुर्लक्ष.
* मध्यरात्री पोलीस यंत्रणा नसल्याने अतिवेगाचा खेळ
* यातील काही जण मद्यपान करून स्टंटबाजीत सहभागी
बदल केलेल्या बाइक
* रॉयल एन्फिल्ड, यामाहा स्पोर्ट्स, पल्सर ग्रँड या बाइकमध्ये गॅरेजमधून ‘मॉडिफिकेशन’
* नियमावलीचे उल्लंघन केलेल्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई
* गुन्हे दाखल करून सोडून देण्यात आल्याने बाइकस्वारांना रान मोकळे
पामबीच मार्गावर सध्या स्टंटबाजीच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून आल्या आहेत. पोलिसांच्या माध्यमातून नाकाबंदी आणि स्टंटबाजी करणाऱ्या वाहनचालकांचा शोध घेऊन कारवाई केली जाणार आहे. स्टंटबाजी प्रकार ज्या ठिकाणी सुरू आहे. त्या ठिकाणची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. पामबीच मार्गावरील कर्णकर्कश्श दुचाकींचाही शोध घेऊन कारवाई करू
– शिरीष पवार, वाहतूक पोलीस निरीक्षक