उरणमध्ये बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत वाढ झाली असून रस्त्याच्या दुरवस्थेनेही यात भर टाकली आहे. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आमदार मनोहर भोईर यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता जेएनपीटी प्रशासन भवनाच्या सभागृहात संबंधित आस्थापनांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.
जेएनपीटी बंदर तसेच बंदरावर आधारित उद्योगांत ये-जा करणाऱ्या जड वाहने, कंटेनर तसेच इतर वाहनांमुळे उरणला वाहतूक कोंडीने त्रस्त केले आहे. त्यामुळे उरण-पनवेल राज्य महामार्गावरील करळ फाटा, द्रोणागिरी नोड, जासई व दास्तान नाका, गव्हाण फाटा, नवघर खोपटा तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब वरील पागोटे पूल, धुतूम, चिर्ले आदी ठिकाणीही प्रवाशांना व वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. यात पावसामुळे पडलेल्या खड्डय़ांचीही भर पडली आहे.
या समस्येतून मार्ग काढण्यासाठी उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी या परिसरातील द्रोणागिरी औद्योगिक नोडच्या नियोजन व रस्ते दुरुस्तीची जबाबदारी असलेली सिडको, बंदर विभागातील रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करणारे जेएनपीटी, सा. बां. विभाग, राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण, वाहतूक नियंत्रणाचे काम करणारे जेएनपीटी व उरण विभागातील वाहतूक पोलीस, उरण परिसरातील कंटेनरची साठवणूक करणाऱ्या गोदामांच्या कंपन्या, मालक, तालुक्यातील सर्व जि.प., पं. स. सदस्य यांची संयुक्त बैठक बोलावली आहे.