पार्किंगने अडवलेल्या अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक समस्या

प्रभाग फेरी : प्रभाग क्र. १८

वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव गेली पाच वर्षे धूळ खात पडलेला असल्यामुळे शहरात सर्वत्र वीजवाहिन्या धोकादायक स्थितीत लटकत आहेत. या लटकत्या तारांमुळे पनवेल हे आजही ब्रिटिशांच्याच काळातील शहर असल्याचा भास होतो. एमएसईबीची महावितरण कंपनी झाली, मात्र शहरातील विजेच्या खांबांनी अजून जागा सोडलेली नाही.

पनवेलसाठी स्वतंत्र उपकेंद्र नाही. त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विविध प्राधिकरणांच्या मुख्याधिकाऱ्यांची मानसिकता नाही. उघडय़ावरील तारांमध्ये अनेकदा तांत्रिक दोष निर्माण होतात आणि वीजपुरवठा खंडित होतो. अनियमित वीज ही पनवेलमधील नेहमीचीच समस्या आहे. जलवाहिन्यांचीही स्थिती तीच आहे. काही वर्षांपूर्वी पनवेलमधील जलवाहिनीमध्ये मृत उंदीर सापडला होता. पाण्याला येणाऱ्या दर्पाची तक्रार रहिवासी बराच काळ करत होते, मात्र जलवाहिनी स्वच्छ केली जात नव्हती. अखेर पाणीपुरवठा बंद झाल्यावर नगर परिषदेने जलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले, तेव्हा उंदीर सापडला. शहरातील सुमारे ३० वर्षांपूर्वीची जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम पालिका प्रशासनाने सुरू करावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

याच प्रभागात अरुंद रस्ते आणि पार्किंग या मोठय़ा समस्या आहेत. अनेकांकडे खासगी वाहने आहेत, मात्र पार्किंगसाठी पुरेशी जागा नाही. पनवेल नगर परिषदेच्या प्रशासनाने इमारतींनाचा बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्र देताना सदनिकेच्या संख्येप्रमाणे पार्किंगची सोय आहे का, हे पडताळून न पाहिल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. बेसुमार पार्किंगमुळे रस्ते अरुंद होत आहेत. कफनगरमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांतून वाहन चालवताना पनवेलकरांना राजकीय पक्षांनी केलेल्या ‘बहरलेले व बदलते पनवेल’ या जाहिरातीची आठवण होते.

महापालिका प्रशासनाने काँक्रीटचे रस्ते बांधण्यापूर्वी रस्ते रुंद करण्यावर भर देणे आवश्यक आहे. पार्किंगसाठी स्वतंत्र बहुमजली इमारत बांधणे महापालिकेला क्रमप्राप्त आहे. पनवेल येथे नव्याने सुरू झालेल्या न्यायालयामुळे या परिसरात पार्किंगवरून आणखी वाद होण्याची चिन्हे आहेत.

पालिकेने तीन आसनी रिक्षांचा प्रवास मीटरप्रमाणे सुरू करण्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी पनवेलवासीयांची अपेक्षा आहे. पनवेल रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडून थेट बल्लाळेश्वर तलावाकडून अमरधामपर्यंत येणारा स्कायवॉक पालिकेने उभारावा, अशी मागणी रोज पादचाऱ्यांकडून होत आहे. शहरातील रस्ते रुंद करून रेल्वेस्थानक ते शहर अशी स्वतंत्र मिनीबस सेवा सुरू करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

तलावांचे रूपांतर पर्यटनस्थळात करावे

तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेलमध्ये तलावांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे बहुतेक तळी दुर्लक्षित राहिली आहेत. तलाव सफाईच्या कामातील भ्रष्टाचाराबद्दल राजकीय गोटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राजकीय पुढारी आरोप करत राहिल्यावर प्रशासनाचे फावते. त्याचप्रमाणे पनवेल नगर परिषदेच्या १५० वर्षांच्या कार्यकाळात एकाही मुख्याधिकाऱ्याने किंवा प्रशासकाने या तळ्यांसाठी स्वतंत्र धोरण राबवलेले नाही. तलावांचे रूपांतर पर्यटनस्थळांत करण्यासाठी कोटय़वधींचा भरुदड सोसावा लागणार असला, तरीही हेच पनवेलचे वैभव असल्यामुळे त्याचे जतन करावे, असे मतदारांचे म्हणणे आहे.

प्रभागक्षेत्र-

नवीन पनवेलमधील सेक्टर २ व ३चा काही भाग, बल्लाळेश्वर तलाव, एचओसी वसाहत, कफनगर, ठाणे नाका, पनवेल महापालिका मुख्यालय, प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालय.

२४,३८० लोकसंख्या

१७,४७२ एकूण मतदार

८,४२१ स्त्री मतदार    

९,०५१ पुरुष मतदार

Story img Loader