लोकसत्ता टीम
पनवेल : सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस मुंबई व उपनगरात बरसल्याने कुर्ला येथील रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. याचा सर्वात मोठा फटका पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना बसला. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपर्यंतची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
पनवेल ते वाशी आणि पनवेल ते ठाणे इथपर्यंतच प्रवासी वाहतूक सुरु असल्याने सकाळच्या सत्रात पनवेल, खांदेश्वर, मानसरोवर, खारघर या स्थानकांमध्ये शेकडो नोकरदार प्रवासी रेल्वेस्थानकात खोळंबल्याने स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
आणखी वाचा-पनवेल: पाऊस बंद होऊन ४ तास उलटले; २७ मोटार पंप, ३५० कर्मचारी लावले तरी कळंबोली दोन फूट पाण्याखाली
दिवसाला पनवेल स्थानकातून थेट मुंबई व उपनगरात रेल्वेच्या येजा करणाऱ्या ३६२ फेऱ्या होतात. तसेच मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सूरु असते. सोमवारी सकाळी पनवेलमध्ये पावसाची संततधार सूरु होती. मात्र मुंबईत जोरदार पाऊस झाल्यामुळे रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने नोकरदार प्रवाशांची एकच तारंबळ उडाल्याचे चित्र होते.