‘भारत बंद’चा परिणाम नाही
नवी मुंबई : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात विविध कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’चा नवी मुंबईत कोणताही परिणाम जाणवला नाही. शहरातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. वाशी बाजारात सर्वाधिक कामगार असूनही तेथील कारभारावर बंदचा कुठलाही परिणाम जाणवला नाही. पाचही कृषी उत्पन्न बाजार समितीत नियमित होणारी आवक कायम होती. याशिवाय रिक्षा, पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या गाडय़ा तसेच बेस्ट बसगाडय़ांची वाहतूक सुरळीत सुरू होती.
केंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरोधात कामगार संघटनांनी एकत्र येत बंदची हाक दिली होती. मात्र ऐन वेळी अत्यावश्यक सेवा त्यातून वगळण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे नवी मुंबईतही अत्यावश्यक सेवेवर परिणाम झाला नाही. सकाळी १२ च्या सुमारास कोकण भवन येथे, तर साडेतीन वाजता वाशीतील महावितरण कार्यालयासमोर कामगारांनी निदर्शने केली. बंदमध्ये बँकांचा समावेश करण्यात आला असला तरी सर्वच बँकांचे व्यवहार सुरू होते. याशिवाय पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांत कामकाज नियमित सुरू होते. सर्व शाळाही सुरू होत्या. दरम्यान, शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.