नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली गावात असणाऱ्या बाळाराम वाडी येथे महावितरणाच्या रोहित्राला ( ट्रान्स्फॉर्मर) ला आज सकाळी ९ च्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याने सुमारे २ हजार घरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अग्निशमन दलाच्या मदतीने सदर आग विझवण्यात आली असून विद्युत प्रवाह सुरळीत होण्यास मात्र संध्याकाळ होणार आहे.
मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली महावितरणाने कित्येक तास वीज पुरवठा खंडित केला. मात्र जेव्हा प्रत्यक्षात मान्सून अर्थात पावसाळा सुरु झाला तेव्हा मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले. त्यात घणसोली कायम अग्रस्थानी आहे. घणसोली गावात वीज पुरवठा ही अनेक वर्षांपासून कायम समस्या असून त्यात आज (सोमवारी) सकाळी ९ च्या सुमारास बाळाराम वाडीत असणाऱ्या रोहित्राला अचानक आग लागली. पावसाने जोर पकडल्याने पावसाच्या पाण्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज महावितरणाने व्यक्त केला आहे. आग लागल्याचे कळताच ऐरोली अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग विझवली. या घटनेने सुमारे १८०० ते २००० घरातील वीज पुरवठा खंडित झाला असून सुरळीत होण्यास किमान चार ते पाच तास लागतील असे महावितरण द्वारे सांगण्यात आले.
हेही वाचा…नवी मुंबई: गवळीदेव डोंगर पावसाळी सहलीने बहरला
तात्पुरता इतर ठिकाणाहून वीज घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रोहित्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने ते काढून दुसरेच लावण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरण अधिकाऱ्याने दिली.