शीव-पनवेल महामार्गावर तीन आसनी रिक्षांत चार प्रवासी भरून वाहतूक सुरू आहे. याशिवाय मीटरप्रमाणे भाडे न घेणाऱ्या रिक्षाचालकांची चलती आहे, हे प्रादेशिक परिवहन विभागाला लख्ख दिसत आहे; पण अडचण अशी आहे की, अशा रिक्षाचालकांविरोधात थेट तक्रार करायला अद्याप कोणीही गेलेले नाही. त्यामुळे कारवाईचे घोडे अडलेले आहे.
नवी मुंबईचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी त्यांच्या बेलापूर येथील दालनात एक बैठक घेतली होती. बैठकीला पनवेल नगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्या वेळी उपायुक्तांनी तालुक्यातील सर्वच बेकायदा वाहतूक बंद करण्याची सूचना केली होती; पण ती अद्याप अमलात आलेली नाही.
कामोठे एमजीएम ते वाशी दरम्यान रिक्षात चार प्रवाशी प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. कळंबोली, कामोठे, खारघर, खांदेश्वर, नवीन पनवेल, करंजाडे, तळोजा, नावडे आणि उलवा या सिडको वसाहतींत रिक्षाचालक आजही मीटरप्रमाणे रिक्षाभाडे घेत नाहीत, अशी प्रवाशांची तक्रार आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने इको व्हॅन चालकांचा बेकायदा प्रवासी वाहतुकीविरोधात धडक मोहीम हाती घेतली होती, तशीच तीन आसनी रिक्षांच्याविरोधात घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
मीटरप्रमाणे भाडे आकारण्यासाठी परिवहन विभागाची मोहीम खारघर रेल्वे ेस्थानकासमोरही दोन दिवसांत सुरू होईल. वाहतूक विभागाची यासाठी सहकार्य घेतले जाईल. खारघरनंतर कळंबोली, कामोठे, खांदेश्वर व पनवेल परिसरात ठीकठिकाणी ही कारवाई करण्यात येईल. प्रवाशांनी मागणी करूनही मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणाऱ्या चालकांविरोधात पनवेलच्या प्रादेशिक परिवहन विभागात थेट तक्रार करता येईल.
आनंद पाटील , पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी