सोमवारपासून वाशी परिवहनकडून प्रारंभ; वाहनचोरीला आळा बसणार
नवी मुंबई : परिवहन विभागाकडून नवी मुंबईत ‘हाय सिक्युरिटीनंबरप्लेट’ बसविण्याला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. नवीन नोंदणी होणाऱ्या वाहनांना सक्तीने ती बसवावी लागणार आहे, तर जुन्या वाहनांना टप्प्या टप्याने बसविण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती वाशी परिवहन विभागाने दिली. यामुळे वाहनचोरीला आळा बसणार असल्याचा दावा परिवहन विभागाकडून करण्यात आला आहे.
वाहने चोरी, नंबर प्लेट काढून गैरवापराचे अनेक गुन्हे घडत असतात. तपासणी करताना किंवा गुन्ह्य़ांची उकल करताना अडचणी येतात. ही अडचण यामुळे दूर होणार आहे. एचएसआरपी ( हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) ही हायटेक टेक्नॉलॉजी वापरून बनविण्यात आलेली असून यात इलेक्ट्रॉनिक चिप तसेच सेन्सॉर आहे. यात वाहनधारकांची संपूर्ण माहिती, तपशील असणार असून सेन्सॉरमुळे याचा गैरवापर होत असेल तर संबंधित प्रशासनाला याची माहिती लगेच मिळणार आहे.
चोरटय़ाने वाहनाची नंबर प्लेट काढण्याचा अथवा बदलण्याचा प्रयत्न केल्यास तसा संदेश संबंधित वाहनमालकच्या मोबाइलवर प्राप्त होणार आहे. त्यामुळे चोरीला गेलेल्या वाहनाचा तपास लवकर होण्यास मदत होणार आहे.
आता नवीन वाहन नोंदणीला ही नंबर प्लेट बंधनकारक असणार आहे. ती लावल्यावरच त्या वाहनाची प्रादेशिक परिवहन विभागाकडून नोंदणी करण्यात येणार असून त्यानंतरच स्मार्ट नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासंबंधी मागील वर्षी केंद्र शासनाकडून अधिसूचना काढण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यानुसार महाराष्ट्र परिवहन आयुक्तांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत.
नवी मुंबईत दररोज ७० ते ८० वाहनांची नोंदणी
या नंबर प्लेटची मागणीनुसार अद्याप तरी निर्मिती झाली नसल्याची माहिती वाशी प्रादेशिक परिवहन विभागाने दिली आहे. नवी मुंबई शहरात दररोज ७० ते ८० नवीन वाहनांची नोंदणी होत असते. मात्र बाजारात तशी उपलब्धता अद्याप निर्माण झालेली नाही. नवी मुंबईत आतापर्यंत नोंदणी झालेली ५ लाख वाहन संख्या आहे. या जुन्या वाहनांना देखील ही नंबर प्लेट सक्तीची करण्यात येणार आहे. परंतु नंबर प्लेटची निर्मिती तितक्या मोठय़ा प्रमाणात झाली नसल्याने ही योजना स्थिराविण्यास बराच कालावधी लागणार आहे.
१ एप्रिलपासून राज्यभरात ही एचएसआरपी( हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) नवीन वाहनांना बंधनकारक असून त्याशिवाय परिवहनमध्ये त्याची नोंदणी होणार नाही. मात्र या नंबर प्लेटची निर्मिती मागणीनुसार उपलब्ध होत नाही.
-दशरथ वाघुले, उपप्रादेशिक अधिकारी.