उरण : करंजा ते रेवस या पारंपरिक जलमार्गाने बोटीत दुचाकी घेऊन शंभर रुपायात प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे उरण ते अलिबाग दरम्यानच्या ४० किलोमीटर रस्ते प्रवासातील खड्ड्यांपासून दिलासा मिळत असून वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होत आहे. त्याचप्रमाणे विना अडथळा आनंददायी प्रवास करण्याची संधी प्रवाशांना मिळत आहे.
उरणच्या करंजा ते अलिबाग तालुक्यातील रेवस या जलमार्गाने शेकडो वर्षांपासून प्रवास सुरू आहे. ही जलसेवा बारमाही सुरू असते. मात्र पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने हवामानातील वातावरणानुसार ही सेवा बंद करण्यात येते. तर यावेळी या प्रवासी बोटीतून ये जा करणाऱ्या दुचाकी वाहनांना बंदी घालण्यात येते. १ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा या बोटीतून दुचाकी वाहने ने आण सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा – एसटी बंद असल्याने खासगी वाहतूकदारांकडून लूट
हेही वाचा – उरण मध्ये दहीहंडीचे लाखोंचे थर; राजकीय पक्षांच्याही हंड्या सज्ज
या मार्गावरील एकेरी प्रवासासाठी २० रुपये तिकीट दर आहे, तर दुचाकी वाहनांसाठी ८० रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे १०० रुपयांत हा प्रवास करता येतो. यामध्ये अलिबागवरून मुरुड तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळ पाहण्यासाठीही याच मार्गाने ये जा करण्याला मुंबई व नवी मुंबईतील प्रवासी प्राधान्य देत आहेत. या मार्गाने अर्धा ते पाऊण तासात अलिबागला जाता येते.