लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : शहरातील मोठे पावसाळी नाले व गटारे साफसफाईची कामे मार्गी लावण्याकरिता महापालिका आयुक्त यांनी पुढाकार घेत ही कामे तसेच वृक्षछाटणी तसेच धोकादायक ठरलेले वृक्ष याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. शहरात विविध ठिकाणी गटारातून काढलेला गाळ पदपथावरच अनेक दिवस पडून राहत असल्याचे आढळत असताना आता उद्यान विभागामार्फत झाडांच्या तसेच धोकादायक स्थितीमधील फांद्या छाटणीची कामे सुरू झाली आहेत. परंतु वृक्षछाटणीच्या फांद्या पदपथावर व रस्त्यावरच पडून राहत असल्याने त्याचा नागरिकांना अडथळा होऊ लागला आहे.

महापालिकेतर्फे पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू झाली असून मे अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. पावसाळी गटारामधून निघालेला मल हा जाड पॉलिथिन किंवा सिमेंटच्या गोण्यांवर टाकण्याकडे संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष होत असते. पावसाळी गटारे साफसफाईची कामे तसेच शहरातील मोठे नाले सफाईची कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात येते त्याप्रमाणे पालिकेने कामाला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा-नवी मुंबई : प्रदूषण, पथदिव्यांमुळे फ्लेमिंगो मृत झाल्याचे निरीक्षण

पावसाळी गटारे व नाले यातून साफसफाईनंतर बाहेर काढून ठेवण्यात येणारा गाळ १ ते २ दिवसांत सुकल्यानंतर लगेच उचलावा व काढलेला गाळ जा़ड पॉलिथिन किंवा सिमेंटच्या गोण्यांवर काढून ठेवावा असे निर्देश दिले असून याबाबत ठेकेदार मात्र दुर्लक्ष करतात. त्यामुळे गाळ मात्र रस्त्यावर व पदपथावरच खाली टाकण्यात आलेला पाहायला मिळतो. त्यामुळे याबाबतही पालिकेने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. धोकादायक वृक्षांची पाहणी करून त्यानंतर ते हटवण्याची कार्यवाही करण्यात येते. उद्यान विभागामार्फत वृक्षछाटणीबाबत विभागवार कार्यवाही सुरू करण्यात आली असून फांद्या रस्त्यावरच टाकल्या जात आहेत. त्याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

Story img Loader