लोकसत्ता प्रतिनिधी
पनवेल: पनवेल शहरामध्ये रस्त्याचा ताबा घेण्यासाठी वृक्षारोपणाचा आधार घेतला जात आहे. शहरातील लक्ष्मी आय रुग्णालयाजवळील रिक्षा थांब्याला सुरक्षा मिळावी यासाठी रिक्षाचालकांनी रस्त्यातच वृक्षारोपण केले. तसेच रुग्णालयाशेजारील सनसीटी हॉटेलचालकानेही इतरांची वाहने उभी राहू नये यासाठी भल्या मोठ्या कुंड्या ठेऊन रस्ता अडविला आहे. यामुळे रस्ता अडविला जात असून वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
आणखी वाचा- तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षेसाठी उद्योजकांचे एक पाऊल
पनवेल शहरातील जेष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपुरकर यांच्या लक्ष्मी आय रुग्णालयाजवळील तीन आसनी रिक्षांचा थांबा सध्या या रस्त्यातील शोभेच्या झाडांच्या कुंड्यांमुळे चर्चेत आला आहे. रस्त्यालगत रिक्षा थांबा अधिकृत असल्याची पाटी येथे लावण्यात आली आहे. रुग्णांना थेट रिक्षाची सोय असावी म्हणून रिक्षा थांबा येथे अधिकृत केला असला तरी रस्त्यातील शोभेच्या रोपांच्या कुंड्या वाहनचालकांना अडचणीच्या ठरत आहेत.
इमारतीसमोरील जागा अडविण्यासाठी शहरातील सर्वांनीच अशा विविध शक्कल लढविल्यास यापुढे पनवेलमध्ये रस्त्यातच कुंड्या उभारा आणि रस्ता काबिज करा असा पायंडा पडण्याची भीती आहे. पालिकेने वेळीच या कुंड्या जप्त करुन हा रस्ता रहदारीस खुला करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.