नवी मुंबई : स्वतःच्या मालकीचे धरण असलेली जल संपन्न शहर अशी बिरुदावल्या लाभलेल्या नवी मुंबई शहरात आजही पावणे एमआयडीसीतील आदिवासी पाड्यांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हात एक ते दीड किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. महापालिकेच्या पाण्याच्या नियोजन शून्य कारभारामुळे पाण्याविना नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो, मात्र अनियमित, कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, परिणामी नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडते.
हेही वाचा >>> महिलेच्या लेटर बॉम्बला विजय चौगुले यांचे रेकॉर्डिंग बॉम्बने उत्तर
पावणेतील वारली पाडा येथील आदिवासींना महापालिकेने वाल्मीकी आवास योजनेतून घरे बांधून दिली आहेत. घरे बांधून पडूनच होती,परंतु मागील ७ वर्षांपूर्वी याठिकाणी आदिवासी नागरिकांना स्थलांतर करण्यात आले, मात्र स्थलांतर करताना येथील नागरिकांना महापालिकेतर्फे पाण्याची सोय उपलब्ध केले जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात येथील रहिवाशांना आजही जलसंपन्न शहरात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे . नवी मुंबई शहराकडे स्वतः च्या मालकीचे धरण आहे,मात्र दिघा,महापे, तुर्भे झोपडपट्टी भागात एमआयडीसी मार्फ़त पाणीपुरवठा केला जातो.
अनियमित, कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. वारली पाडा याठिकाणी पाण्याची टाकी आणि घरोघरी नळ जोडणी देण्यात आलेली होती, परंतु वर्षानुवर्षे बांधून दिलेली घरे बंद असल्याने येथील नळ जोडणीला आतून गंज लागलेला आहे . त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील रहिवाशांना जुन्या वारली पाड्यातून पाणी आणावे लागत आहे. नाहीतर एक ते दीड किलोमीटर असलेल्या फुटलेल्या जलवाहिणीचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या उन्हाचा तडका वाढला असून पाण्याची गरज अधिक भासते , मात्र या रखरखीत उन्हात येथील रहिवाशांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई: मुलगा होत नाही म्हणून त्रास देणाऱ्या पतीस एक वर्ष सहा महिन्यांचा कारावास आणि १० हजाराचा दंड
वारली पाडा येथील नागरिकांना एमआयडीसीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र एमआयडीसीमधील पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अनियमित असल्यामुळे पाण्याची टंचाई भासते. पाण्यासाठी इतर ठिकाणी येथील रहिवाशांना पायपीट करावी लागते . महापालिकेने पाणी पाणीपुरवठा करावा याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शशी भोईर, माजी नगरसेवक