पूर्वा भालेकर, लोकसत्ता
नवी मुंबई : शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड रुजावी, भविष्यातही विज्ञान विषयाचा अभ्यास करण्याची रुची त्यांच्यात निर्माण व्हावी यासाठी नवी मुंबई महापालिकेने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. नवी मुंबई महापालिका शाळेतील ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित यांसारख्या विषयांमध्ये शिष्यवृत्ती मिळाली आहे, अशांना महापालिकेने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) सहल घडविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
शालेय वयात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड आहे, ते विद्यार्थी या उपक्रमात स्वत:हून सहभागी होताना दिसतात. शहरात भविष्यात वैज्ञानिक घडावेत यासाठी नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान सहल काढली जाते. या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषय समजतात. या उपक्रमाशी निगडित पालिकेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ज्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड आहे, विज्ञान विषयाचे उत्तम ज्ञान आहे तसेच विज्ञान विषयात उत्तम गुण प्राप्त झाले आहेत तसेच शिष्यवृत्ती मिळालेली आहे, अशा नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इस्राोची सहल आयोजित केली जाणार आहे. ही सहल पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. या उपक्रमासाठी १९१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यातील ३७ विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळालेले आहेत. तर उर्वरित १५४ विद्यार्थी हे मेरिट स्कॉलरशिप मिळालेले आहेत.
आणखी वाचा-करंजा-कोंढरीमध्ये २५ दिवसांतून एकदाच पाणी; ग्रामस्थांमध्ये संताप, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन
ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने इस्राोची सहल घडविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात भविष्यात वैज्ञानिक घडतील असा यामागचा मुख्य उद्देश आहे. -योगेश कडूसकर, शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महापालिका
विज्ञान अधिवेशनाच्या निमित्ताने….
नवी मुंबईतील वाशी उपनगरात मराठी विज्ञान परिषदेची राज्यस्तरीय परिषद नुकतीच भरली होती. या परिषदेच्या निमित्ताने देशभरातील नामांकित असे शास्त्रज्ञ तसेच संशोधकांनी वाशी नगरास भेट दिली होती. या वेळी परिषदेतर्फे शालेय विद्यार्थ्यासाठी विज्ञान मेळा घेण्यात आला. या विज्ञान मेळ्यास पालिका शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी भेट दिली. या परिषदेच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांसाठी एखादी विज्ञान सहल आयोजित केली जावी अशा स्वरूपाची चर्चा पुढे आली. या परिषदेला उपस्थित महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना ही कल्पना आवडल्याने त्यांनी याबाबत घोषणा केली. आयुक्तांच्या घोषणेनंतर यासंबंधीच्या हालचालींना वेग आला असून पुढील दोन महिन्यांत विद्यार्थी आणि ठरावीक शिक्षकांना इस्रोच्या सहलीसाठी रवाना केले जाणार आहे. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.