पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष या घटक पक्षांमध्ये आपसांत रस्सीखेच सुरू आहे. या मतदारसंघातील मतदारांनी मागील तीन वेळा प्रशांत ठाकूर यांना विजयी केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यास ती ठाकूर यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर यांनी २०१९ च्या निवडणुकीत शेकापचे हरेश केणी यांचा ९२ हजार ७३० मतांनी पराभव करून तिसऱ्यांदा आमदारकी मिळविली. पनवेल विधानसभा क्षेत्रात सध्या पाच लाख ५४ हजार ३१ मतदार आहेत. यामध्ये स्त्री मतदारांची संख्या दोन लाख ५७ हजार १४० आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीच्या उमेदवारांसाठी हा मतदारसंघ सुरक्षित मानला जातो. विधानसभेची निवडणूक ३९ दिवसांवर येऊन ठेपली असली तरी अजूनही महायुतीने पनवेलचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रशांत ठाकूर यांचे नाव जाहीर केलेले नाही. तरीही ठाकूर यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांची शिवसेना मविआला अनुकूल?

त्या उलट पनवेलच्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये वातावरण आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शेकापचे बाळाराम पाटील यांनी अनेकदा पनवेल विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना एकदाही मतदारांनी भरघोस मतांचा आशीर्वाद दिला नाही. तरीही मागील दोन आठवड्यांपासून शेकापच्या पाटील यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराची जोरदार आघाडी घेतली आहे.

पनवेल विधानसभा क्षेत्रात शहरी मतदारांचा टक्का मोठा असल्याने शेकाप, शिवसेना ठाकरे गट आणि भाजप या तिन्ही पक्षांनी शहरी मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेचे पनवेल जिल्हाध्यक्ष शिरीष घरत हेसुद्धा उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक असल्याने महाविकास आघाडीत पारंपरिक शेकापकडे असणारा पनवेल विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला (ठाकरे गट) मिळतोय का अशी चर्चा पनवेलमध्ये सुरू झाली आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका लीना गरड यांनीही मातोश्रीच्या वरिष्ठांकडे उमेदवारीसाठी मागणी केल्यामुळे ठाकरे सेनेतून दोन इच्छुक आहेत.

उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी जाहीर व्यासपीठावरून अनेकदा पनवेलवर भगवा फडकविण्याची इच्छा व्यक्त केली. पनवेलमध्ये अनेक वर्षे ठाकरे कुटुंबीयांचे वास्तव्य होते. त्यामुळे आजोबांच्या कर्मभूमीत ठाकरेंच्या सेनेचा भगवा फडकविण्यासाठी ठाकरे यांनी पनवेल विधानसभेवर दावा सांगितल्याचे बोलले जात आहे. परंतु, अजूनही महाविकास आघाडी आणि महायुती पनवेलमधील दोन्ही परस्परविरोधी राजकीय पक्षांच्या विरोधी स्पर्धकांनी त्यांचा प्रचार स्वयंघोषित पद्धतीने सुरू केला आहे.

प्रीतम म्हात्रेंच्या प्रचारामुळे उरणध्ये समीकरण बदल

शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच उरण विधानसभा क्षेत्रात प्रचाराची जोरदार मुसंडी घेतली आहे. कर्जत, महाड व उरण हे तीन विधानसभा मतदारसंघांवर यापूर्वी शिवसेनेकडून दावा केला जात होता. प्रीतम म्हात्रे यांनी प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे पारंपरिक उमेदवारी वाटपाची समीकरणे बदलली आहेत. २०१९ च्या निवडणुकीत उरण मतदारसंघातून भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी अवघ्या ५,७१० मतांनी शिवसेनेच्या मनोहर भोईर यांचा पराभव केला होता. त्यामुळे हा मतदारसंघ म्हात्रे यांना सुरक्षित वाटत आहे. शिवसेना ठाकरे गटाला उरणमधून उमेदवारी न मिळाल्यास शेकाप व शिवसेनेमधील वादामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची जोरदार चर्चा पनवेलमध्ये आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : आचारसंहिता लागू झाल्यापासून ७२ तासांत शहर फलकमुक्त

मी इच्छुक आहे. त्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांची भेट घेतली. लीना गरड यांना पक्षाने महानगर महिला संघटकपद दिल्यानंतरही त्या कॉलनी फोरमच्या माध्यमातून काम करत असल्याचे दिसते. महाविकास आघाडी आणि शिवसेनेने (ठाकरे गट) मला अद्याप उमेदवारी दिली नसली तरी शिवसेना पक्ष मलाच उमेदवारी देईल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. – शिरीष घरत, जिल्हाध्यक्ष, शिवसेना ( ठाकरे )

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tug of war in mahavikas aghadi for panvel candidature shirish gharat balaram patil leena garad interested for candidature ssb