नवी मुंबईत पाणीबचतीचे उद्दिष्ट अपूर्ण
संकट एका बाजूने येत नाहीत. तसं यंदा पाण्याचं झालंय. पाणी पुरवून वापरण्यासाठी कपात केली तरीही बचतीचा उद्देश पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर नाही. एमआयडीसी क्षेत्रात ४८ तासांचा शटडाऊन संपल्यानंतर गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी इतर कोणत्याही वापरासाठी साठवून न ठेवता नागरिक स्वच्छ पाणी येईस्तोवर गटारास अर्पण करीत आहेत.
सिडको, गावठाण परिसरात मोरबे धरणातून मिळणारे पाणी दिवसभरातून एकच वेळ सोडण्यात येते; ज्या ठिकाणी जलवाहिनीला गळती आहे. तिथे सुरुवातीची १५ ते २० मिनिटे, तर काही ठिकाणी अर्धा तासाहून अधिक काळ गढूळ पाणीपुरवठा होतो. स्वच्छ पाणी येईपर्यंत ते गटारात सोडून दिले जात असल्याने पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. एमआयडीसी भागातील दिघा, इलठण पाडा, यादवनगर, चिंचपाडा या भागांत गुरुवार आणि शुक्रवार असा ४८ तासांचा शटडाऊन घेतला जातो.
सिडको व गावठाण वसाहतीतील ऐरोली, घणसोली, कोपरखरणे, नेरुळ, बेलापूर, सानपाडा येथे दिवसभरातून एक वेळ पाणी येते. शटडाऊनमुळे जलवाहिन्या कोरडय़ाठाक पडतात. त्यात काही प्रमाणात कचरा जाण्याची शक्यता असते आणि ज्या ठिकाणी जलवाहिनींना गळती आहे. तिथे पाणी गढूळ होते. नागरिक सुरुवातीचे अस्वच्छ पाणी इतर कारणांसाठी वापरण्याऐवजी ते गटारात सोडून देत आहेत. त्यामुळे पाण्याची मोठी नासाडी होत असून यावर पालिकेने तत्काळ उपाय योजण्याची मागणी होत आहेय

शटडाऊन घेतल्यानंतर जलवाहिनी ही मोकळी होते. त्या वेळी ज्या ठिकाणी अंतर्गत भागात गटारामधून जमिनीखालून गेलेल्या जलवाहिनी या लिकेज असल्यामुळे त्यामध्ये पाणी शिरते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात गढूळ पाणी येते. पण या गढूळ पाण्याचा वापर कपडे धुण्यास, भांडी घासण्यास अथवा झाडांना देण्यास करण्यात यावा. दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे. अंतर्गत जलवाहिनी या पालिकेकडून टाकण्यात येत असल्यामुळे पालिकेने कार्यवाही करावी.
– प्रकाश चव्हाण, एमआयडीसी कार्यकारी अभियंता