पनवेल : सध्या नवी मुंबई आणि महामार्ग वाहतूक पोलिस दलात नेमंक चाललंय काय हे विचारण्याची वेळ आली आहे. मंगळवारी रात्री साडेसहा वाजण्याच्या सूमारास ठाणे परिक्षेत्रातील पालघर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कळंबोली येथील महामार्ग पोलीस चौकीत बसून पोलीस उपनिरीक्षकांकडून एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केले. रामचंद्र वारे असे अटक केलेल्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकाचे नाव आहे. पोलीस अधिकारी वारे यांच्यावर मुंबई पूणे द्रुतगती महामार्गासह मुंबई गोवा महामार्ग यावरील वाहतूक नियमनाची जबाबदारी आहे. याच पोलीस बीटवर पोलीस उपनिरीक्षकांच्या नेमणूकीच्या बदलीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची मागणी पोलीस अधिकारी वारे यांनी केली होती.
याबाबत संबंधित पिडीत पोलीसांनी ठाणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हा सापळा रचण्यात आला. खालापूर व पळस्पे पोलीसबीट मिळण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकांनी मागणी केल्यानंतर पोलीस अधिकारी वारे यांनी रोख रक्कम मागणी केल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या अधिका-यांनी त्याची खात्री केली. विशेष म्हणजे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता पोलीस अधिकारी वारे यांनी लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर लगेच त्यांना ताब्यात घेण्यात आले. रात्री तीन वाजेपर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम कळंबोली पोलीस ठाण्यात सूरु होते.
यापूर्वीही नवी मुंबई पोलीस दलात अशाचप्रकारे पोलीस अधिका-यांना पोलीस ठाण्यांचे प्रभारी पद देण्यासाठी सेवाजेष्टतेचा नियम डावलून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असून नवी मुंबईत काम करुन पुन्हा नवी मुंबईतच अनेक अधिकारी बदली घेत असल्याचा गंभीर आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्य सरकारकडे केला आहे. या आरोपानंतरही काही बदललेले नाही हेच सांगणारी मंगळवारची वारे यांची घटना आहे. नवी मुंबई पोलीस दलाचे स्वतंत्र लाच लुचपत प्रतिबंधक खाते आहे. मात्र या प्रकरणातील पिडीत पोलीस उपनिरीक्षकांनी सापळा यशस्वी होन्यासाठी पालघर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली.
नवी मुंबई पोलीस दलात आणि वाहतूक विभागात अनेक गोष्टी चुकीच्या होत असल्याने शहरभर वाहतूक कोंडीचा प्रश्न तसाच आहे. त्यामुळे अधिका-यांच्या बदल्या होणे गरजेचे आहे. याबाबत मी विधानसभेतही आवाज उठविला होता. त्यामुळे आगामी काळात होतील अशी अपेक्षा आहे. – मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर विधानसभा मतदारसंघ