नवी मुंबई : सिंगापूरमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत २०० पेक्षा जास्त बेरोजगार युवकांची फसवणूक करणाऱ्या चौकडीपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा नोंद झाल्यावर अवघ्या ४८ तासांत आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई एपीएमसी पोलिसांनी केली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहम्मद सुनुस अन्वर अन्सारी, लीना आरोरा, पुनीत आरोरा, व विकी जोसेफ असे यातील आरोपींची नावे आहेत. यापैकी लीना अरोरा आणि विकी जोसेफ यांना मध्यप्रदेश इंदौरमधून अटक करण्यात आली आहे. वाशी सेक्टर १९ येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील कमोडीटी एक्स्चेंज इमारतीत जी.एस.ओ.एस प्लेसमेंट नावाचे कार्यालय थाटण्यात आले. विदेशात खास करून सिंगापूर येथील विविध हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात नोकरी उपलब्ध असल्याची जाहिरात संकेत स्थळ आणि समाज माध्यमातून करण्यात आली होती. या आमिषाला बळी पडून कल्याण येथील पवन वासनकर यांनी नोकरीसाठी पैसे भरले होते. त्याच्याप्रमाणेच इतर अनेकांनी १ लाख ते ५ लाखांच्या घरात पैसे भरले होते. विशेष म्हणजे पैसे भरताना टप्प्या टप्प्याने भरण्याची सुविधा असल्याने अनेकजण या आमिषाला बळी पडले आहेत.

हेही वाचा – उरण- पनवेल मार्गावरील जेएनपीटी वसाहती समोर वाढती कोंडी

हेही वाचा – मालमत्ता सर्वेक्षणाचा देखावा? नवी मुंबईत अवघ्या दहा हजार मालमत्ता वाढल्या; गावठाण, वसाहतींमध्ये सर्वेक्षण नावालाच

अटक आरोपींच्या चौकशीतून किमान २०० जण या आमिषाला बळी पडले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुधाकर ढाणे यांच्या मार्गदर्शखाली एक पथक नेमले ज्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर शिरुरकर, सहायक पोलीस निरीक्षक अशोक ढमाले, पीएसआय निलेश महाडिक यांचा समावेश होता. तांत्रिक तपास आणि खबरीने दिलेल्या माहितीनुसार अरोरा आणि जोसेफ हे इंदौर येथे असल्याचे कळताच तत्काळ पथक पाठवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested from madhya pradesh for showing lure of jobs in singapore and fraud ssb