नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका महिलेनं आपल्या पोटच्या दोन मुलांची हत्या करून स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून दोन्ही मृत मुलं अल्पवयीन आहेत. या दुर्दैवी घटनेचं नेमकं कारण समोर आलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी मृत मुलांच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवी मुंबईतील घणसोली गावात चिंच आळी येथे साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेनं स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलांची गळा चिरून हत्या केली आहे. मुलांची हत्या केल्यानंतर संबंधित मातेनं स्वतःही हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण ही बाब शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यामुळे महिलेचा जीव वाचला आहे. शेजाऱ्यांनी रबाळे पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुष्पा गुर्जर असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे. तर टीपू (वय-४) आणि राहुल (वय-१) असं खून झालेल्या मुलांची नावं आहेत.
गेल्या काही वर्षांपासून हे दाम्पत्य चिंच आळीत राहत होते. ते मूळचे राजस्थानातील असून महिलेचा पती आइस्क्रीम विकण्याचं काम करतो. ही घटना आर्थिक अडचणीत घडली नसल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सध्या महिलेवर उपचार सुरू असून रात्री साडे अकरा वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.