उरण : उरण रेल्वे स्थानकातून रात्रीच्या ११.३० वाजता दुचाकीवरून जात असताना वेगवान वाहनाने जोराची धडक देत दुचाकीवरील तिघांना चिरडले. या अपघातात उपचारादरम्यान पवित्र बराल (४०) व रश्मिता बराल (३७) या पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर ४ वर्षांच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.
हेही वाचा – धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
हेही वाचा – डॉ. सुजय यांच्या सभेत ऐकविलेली ती ध्वनीफीत बनावट – निलेश लंके
या घटनेची उरण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी वाहनचालक जय चंद्रहास घरत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत उरणच्या नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात असून या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात जनवादी महिला संघटनेने उरण पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. संघटनेच्या नेत्या हेमलता पाटील व कामगार नेते कॉ. भूषण पाटील, इतर पदाधिकारी उपस्थित होते. अपघात इतका भयानक होता की यामध्ये दुचाकीचे तुकडे झाले आहेत. या अपघातानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने पोलिसांत फिर्याद दाखल केली असून चालकाने या जवानाला शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. या भीषण अपघातानंतर उरण स्थानक परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवासी आणि वाहनचालकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.